• Fri. Apr 25th, 2025 3:57:32 AM

    जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 13, 2025
    जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद




    नांदेड दि. १३ एप्रिल :- अनेक वर्षापासून जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने पुढील वर्षापर्यंत म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीपर्यत त्यांचे स्मारक उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
    आज नांदेड येथे मातोश्री मंगल कार्यालय, कौठा येथे धनगर समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. समाजातील वंचित, शोषित,उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी जे-जे करता येईल ते कामे करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


    यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार श्रीजया चव्हाण तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
    आतापर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी संविधानिक मार्गाने जे-जे करता येईल ते सर्व कामे केली आहेत. यापुढेही नियमांच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने वंचित घटकांना न्याय मिळावा यादृष्टीने काम करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
    समाजाच्या सर्व मागण्या बाबत सकारात्मकपणे शासनाकडे बाजू मांडण्यात येईल. ती कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न – खासदार अशोक चव्हाण
    महाराष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित घटकाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी सर्वानी मिळून काम करणे गरजेचे आहे. उपेक्षित वर्गाला कायदेशिर मार्ग काढून टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. वंचित घटकांचे  प्रश्न मार्गी लावण्यासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करुन प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल, असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
    तसेच शासन स्तरावर नांदेडच्या विकास कामाबाबत मागणी केली असून याबाबत लवकरच शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल ,असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच महाराष्ट्रात मागासलेल्या मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

    यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व आमदार महोदयांनी नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांना त्यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांचा धनगर समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.


    00000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed