Akola Crime News : अकोल्यातील पातूरमध्ये हनुमान जयंतीच्या रात्री एका 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपींनी केलेल्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
मृतदेह आढळल्याने खळबळ
सूत्रांच्या माहितीनुसार, काही स्थानिक नागरिक रात्रीच्या सुमारास गावात गोथनमधून जात होते. तेव्हा त्यांना एक व्यक्ती रस्त्यावर बेशुद्ध पडलेले दिसले. जवळ जाऊन बघितल्यावर तो व्यक्ती पातूर येथील मुजावर पुऱ्यातील रहिवासी सैयद झाकीर सैय्यद मोहिदीदिन असल्याचं कळलं. त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या पोटात खोल आणि तीक्ष्ण शस्त्राच्या जखमा झाल्या, ज्यामुळे भरपूर रक्तस्त्राव होत असल्याचं आढळलं. लगेच याची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून त्वरित तपासाला सुरुवात
ही घटना कळताच पातूर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून तपास सुरू केला, आणि मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली. प्राथमिक तपासणीत ही हत्या अत्यंत क्रूरतेने केली असल्याचं आढळलं आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही, कॉलडिटेल्सची तपासणी
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी सुरू केली आहे. परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. मृतकाच्या मोबाईल कॉल डिटेल्सच्या माध्यमातूनही तपास पुढे नेला जात आहे. हत्या कुठल्या कारणातून झाली याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
पातूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पण अद्याप हत्येचं कारण समजू शकलेलं नाही. मृत व्यक्तीचा कुणाशी वैर होतं का? की हा खून आर्थिक विवाद, कौटुंबिक संघर्ष आणि सूडबुद्धीसह सर्व संभाव्य बाबींचा पोलीस सखोलपणे चौकशी करीत आहेत.
तपास करण्यासाठी पथकाची नेमणूक
जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. शक्य तितक्या लवकर या प्रकरणाचा तपास करून, आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.