विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात धक्के बसले आहेत. राजन साळवी यांनी शिंदे गटाची साथ धरली. त्यानंतर स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा तसेच तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं स्नेहल जगताप यांच्यानंतर रायगडमधून ठाकरेंचा आणखी एक मोठा नेता पक्ष सोडून जात असल्यामुळे रायगड मध्ये ठाकरेंची ताकद दुबळी होत चालली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासमोर मोठा प्रश्न
कोकणात सध्या ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच उरत नसल्याचे दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी उमेदवारांचा वानवा भासणार आहे. जे उरले सुरले आहेत ते देखील महायुतीच्या वाटेवर आहेत. नुकताच ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला होता. त्यांनी भाजपला चकवा देत थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या जखमेची खपली पडते ना पडते आता आणखी एका नेत्याने ठाकरेंची साथ सोडली आहे.
शेडगेंची घरवापसी
यामुळे तालुक्यात आता शिवसेना वालिच उरला नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे समीर शेडगे यांनी शिवसेना अखेरचा रामराम ठोकत आपला राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला आहे.समीर शेडगे हे आधी सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र आठ वर्षापूर्वी रोहा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. तर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण आता शेडगे यांची घरवापसी तटकरे यांनी घडवून आणली आहे.
स्नेहल जगतापांचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी काही दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीतील भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात रंगली होती. अशातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे. आता स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.