Nanded News : कर्जमाफी होणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानंतर बँकांनी शेतकऱ्याकडून कर्जाच्या परतफेडीसाठी हालचाली सुरु केल्या आहे. यातच कर्ज कसे फेडावे, या चिंतेतून नांदेडमधील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी गावात ही दुर्देवी घटना घडली. हरिदास बोंबले (वय ४०) असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून सरकार टीका केली आहे. Maharashtra Weather Update : राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा, अवकाळीचे संकट
हरिदास बोंबले हे धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. २२ मार्च २०१८ साली बोंबले यांनी कुंडलवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र मधून किसान क्रेडिट कार्ड वर १ लाख ८३ हजार पीक कर्ज काढले होते. कर्ज फेडण्याबाबत बँकेने स्मरणपत्र पाठवले होते. कर्ज न फेडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बँकेने दिला होता. कर्ज माफी होणार अशी अपेक्षा हरिदास बोंबले यांना होती. परंतु बॅकवॉटरमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. अपेक्षे प्रमाणे उत्पन्न देखील मिळाले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता बोंबले यांना होती.
दरम्यान बँकेकडून सातत्याने बोंबले यांना नोटीसा दिल्या जात होत्या. कारवाईचा इशारा बँकेकडून देण्यात आल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. तेव्हा कर्ज कसे फेडावे, या चिंतेतून हरिदास बोंबले यांनी १० एप्रिलला सकाळी ९ वाजता शेतातील एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बँकेच्या नोटीसमुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात सोशल मीडियावरही पोस्ट शेयर होत आहेत. मयत शेतकऱ्याला पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेनंतर दोन्ही मुलाच्या डोक्यावरील वडिलाचे छत्र हरवले आहे. दरम्यान याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका
दरम्यान या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. ही आत्महत्या नाही, सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी आहे, अशी एक्स पोस्ट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे जगणे असह्य होऊन शेतकरी गळफास लावून जीवन संपवू लागले आहेत. सरकारने बहुमताच्या नशेतून बाहेर पडून निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे, असेही सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.