Sharad Pawar and Ajit Pawar together in Meeting : शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते आपापसातील राजकीय मतभेद बाजूला सारून, साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत एकत्र आले. शरद पवार यांनी या बैठकीत अजित पवारांना मदत केली. या बैठकीतला व्हिडीओ देखील समोर आला आहे.
साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शरद पवार हे साताऱ्यात होते. तसेच अजित पवार देखील या बैठकीसाठी आले. विशेष म्हणजे दोन्ही नेते या बैठकीत अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसले. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णयही घेतले आहेत. याच बैठकीतला एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्यावर्षी किती उत्पन्न होतं याबाबत चर्चा सुरु होती. या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सभासदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली. अजित पवार यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबत तपशील होते. पण त्यांना ते मिळत नव्हते. यामुळे शरद पवार यांनी त्यांना ते तपशील शोधून देण्यात मदत केली. शरद पवार यांनी यासाठी त्यांना कागजपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला. यानंतर अजित पवार यांनी आकड्याचं वाचन केलं.
शरद पवार यांची ‘एक्स’वर पोस्ट
दरम्यान, शरद पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत आजच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक आज ‘छत्रपती शिवाजी कॅालेज, सातारा’ येथे पार पडली. या बैठकीत संस्थेने ‘रयत’ मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती, जागतिक घडामोडी वगैरे वैविध्यपूर्ण व माहितीपूर्ण लेख समाविष्ट केले जातील व त्याचा प्रसार होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.
याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, आयओटी, रोबोटिक्स, थ्री.डी. प्रिंटिंग या विषयांचा अभ्यासक्रम संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याविषयीचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सातारा येथे सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
असे अनेक दूरदर्शी उपक्रम हाती घेण्याचे निर्णय झाले. मॅनेजिंग कौन्सिलच्या सर्व सदस्यांचे केलेल्या सहकार्याबाबत मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून आभार मानतो, असं शरद पवार म्हणाले आहेत.