Pune News : पुण्याच्या राजगुरुनर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेसंदर्भातील सीसीटिव्ही फुटेजही समोर आला आहे.
शुक्रवारी (११ एप्रिल)रोजी ही अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जाण्याचे कारण सांगून गायब झाली होती. तसेच एका तरुणासोबत ही मुलगी दुचाकीवरून जाताना सीसीटिव्हीत देखील समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सूरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात आढळून आला आहे. तपासणीत मुलीच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापती आढळून आल्या आहेत. यावरून पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकून दिल्याचा संशय आहे. मुलीच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. ही हत्या नेमकी का झाली? याचा तपास सुरु केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचा पुरावा
पोलीस तपासात मुलीला दुचाकीवरून घेऊन जाणारा तरुण कोण होता, याचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील माहितीच्या आधारे या मुख्य संशयिताची ओळख पटवण्यासाठी आणि हत्येचे कारण शोधण्यासाठी खेड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत.
खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलीच्या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी या क्रूर हत्याकांडाचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, लवकरात लवकर आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे.