• Sun. Jul 26th, 2026
    Devendra Fadnavis: पंढरपूरहून अचानक दिल्ली गाठली, महाराष्ट्रात बदलाचे वारे? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला!

    नागपूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यातच पंढरपूरहून नागपूरला परतण्याऐवजी फडणवीस सोलापूरहून थेट दिल्लीला रवाना झाल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “मी आज नागपूरला आहे, संध्याकाळी मुंबईला जाणार आहे, मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे,” असे सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस केंद्रात जाणार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे दिली जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली होती. त्यातच फडणवीस थेट दिल्लीला गेल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, त्यांच्या या मिश्किल प्रतिक्रियेमुळे सध्या तरी या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

    दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर ठाकरे बंधूंनी केलेल्या सेलिब्रेशनवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य करत मुख्यमंत्री म्हणाले की, “काही हरकत नाही, उद्धव ठाकरे यांना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळालं, त्याचा मला आनंद आहे. मी देखील आनंदी आहे, शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते कुठल्या व्यक्तीचे कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे आहे. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचे हित महत्वाचे असतं ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणे आवश्यक होते ते निर्णय मोदीजींनी केले. उद्या संसदेत विधेयक मांडले जाणार, ज्यामुळे पुढच्या काळात आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे ते सुरक्षित राहण्याकरता कठोर निर्णय असणारा कायदा असेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    ‘भाजप विरुद्ध भारत’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्याबाबत फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटते की अशा प्रकारचे डायलॉग हे गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक वेळा मारलेले आहेत. पण त्यांच्या डायलॉगचा कुणावरही परिणाम होत नाही. संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे. रात्री एक वाजता टाकलेला मोदींचा व्हिडिओ हा इंस्ट्राग्रामचे जगातले रेकॉर्ड मोडतो या वरून लक्षात येतं भारत कोणाच्या पाठीशी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.