• Wed. Jun 17th, 2026

    IAS Officers Transfer : महाराष्ट्रात 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती

    IAS Officers Transfer : महाराष्ट्रात 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती

    IAS Officers Transfer in Maharashtra : राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठा फेरबदल करत पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता मेश्राम यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यासाठी 9 मोठे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची बातमी ताजी असताना आता आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने राज्यातील 5 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनीता मेश्राम यांचा देखील समावेश आहे. अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अनीता मेश्राम यांना अकोला जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी मिळाली आहे.

    अखेर सात दिवसांनी केडीएमसीला मिळाले नवे आयुक्त

    कल्याण डोंबिवली महापालिका अर्थात केडीएमसी महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी जवळपास गेल्या तीन वर्षांपासून इंदुराणी जाखड या पाहत होत्या. पण त्यांची 1 एप्रिलला पालघर जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी कुणाची वर्णी लागते? ते पाहणं औत्सुक्याचं होतं. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची महापालिका तसेच मुंबईपासून जवळच असणारं शहर यामुळे केडीएमसी महापालिकेच्या आयुक्तपदी कोण असणार? याबाबत उत्सुकता होती. अखेर इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर सात दिवसांनी केडीएमसी महापालिकेला आयुक्त मिळाले आहेत.

    अभिनव गोयल हे 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते आयएएस परीक्षेत 36 व्या रँकने उत्तीर्ण झाले होते. तसेच त्यांचं कानपूर आयआयटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचं देखील शिक्षण झालं आहे. त्यांनी तिथून पदवी मिळवली आहे. गोयल 2018 मध्ये नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ, नंतर धुळ्याचे जिल्हाधिकारी, यानंतर ते सध्या हिंगोलीचे विद्यमान जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. यानंतर आता त्यांची कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र सरकारकडून ‘या’ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    1) आयएएस सी. के. डांगे यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    2) आयएएस संजय काटकर यांची मुंबईत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    3) आयएएस अनीता मेश्राम यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. अनीता मेश्राम या महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होत्या. पण त्यांची आता अकोला येथील जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    4) आयएएस अभिनव गोयल हे सध्या हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. पण त्यांची नियुक्ती आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयु्क्तपदी करण्यात आली आहे.

    5) आयएएस आयुषी सिंह यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed