Tanisha Bhise Case : तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भिसे कुटुंबियांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार देवेंद्र फडणवीस यांना सांगितला. मुख्यमंत्र्यांनी सर्व घटनाक्रम ऐकून घेतला. तसेच दोषींवर कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलं.
“आम्ही भिसे कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना आमचं म्हणणं, निवेदन लेखी स्वरुपात दिलेलं आहे. त्यांनी झालेली संपूर्ण घटना सविस्तर ऐकून घेतली. त्यांनी भिसे कुटुंबियांसोबत व्यवस्थित चर्चा केली. त्यांनी भरपूर वेळ दिला. त्यांनी संपूर्ण इत्यंभूत माहिती घेतली. या घटनेतील दोषींना कडक शासन केलं जाईल. प्रत्येक गोष्टी न्यायाने केल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी भिसे कुटुंबाला आश्वास्त केलं आहे”, अशी प्रतिक्रिया अमित गोरखे यांनी दिली.
तनिषाची नणंद काय म्हणाली?
“आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. ते आम्हाला न्याय मिळवून देतील. मुख्यमंत्री म्हणाले, तुम्हाला न्याय देऊ. आमच्या वहिणींसोबत जसं झालंय तसं कुठल्याही इतर महिलेसोबत तसं होऊ नये. ते हॉस्पिटल धर्मादायी व्हायला हवं”, अशी मागणी यावेळी मृतक तनिषा भिसे यांच्या नणंदने केली.
“आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर झालेला प्रकार सांगितला. आम्हाला काय त्रास झाला, डॉक्टरांनी कशाप्रकारे त्रास झाला, आमच्याकडे पैसे असून त्यांनी पेशंटला दाखल करुन घेतलं नाही हे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडलं. ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका नातेवाईकाने दिली.
‘डॉक्टर घैसासचे लायसन रद्द करण्यात यावं’
“जी माहिती आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत तीच माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिली आहे. ज्या गोष्टी आमच्यासोबत घडल्या त्या सर्व पोलीस प्रशासनाला सांगितल्या आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं घडलेला प्रकार हा खूप संवेदनशील असून याच्या वरती नक्कीच कारवाई होईल आणि भविष्यात अशा तनिषा घडणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल. रोष फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर आहे. हा लढा फक्त माझ्या एकट्याचा राहिला नसून संपूर्ण जनतेचा हा लढा झाला आहे. डॉक्टर घैसासचे लायसन रद्द करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिल आहे. तुम्हाला न्याय मिळवून देऊ. संपूर्ण हॉस्पिटल हे धर्मदाय व्हावं आणि रुग्णाला योग्य उपचार मिळावेत अशी विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे”, अशीदेखील प्रतिक्रिया भिसे कुटुंबियांनी दिली.