Ratnagiri News : रत्नागिरी शिवसेनेतील जिल्हा कार्यकारिणी रद्द करण्यात आली आहे. स्वत: मंत्री उदय सामंत यांनी याबाबत घोषणा केली आहे. येत्या 8 ते 15 दिवसांत नवी कार्यकारिणीची घोषणा करण्यात येईल, अशीदेखील माहिती त्यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अनेक बडे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. त्या सर्वांना सामावून घेण्यासाठी सध्याची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती शिंदेसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच उद्धवसेनेतील अनेकजण शिंदेसेनेत आले. निवडणुकीनंतर ‘ऑपरेशन टायगर’मध्ये या मोहिमेला जोर आला. त्यामुळे पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असे ते म्हणाले. नव्याने पक्षात आलेल्या सर्वांना कार्यकारिणीमध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठीच जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
आता नव्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी कार्यकारिणी येत्या ८ ते १५ दिवसांत जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले. या नियुक्त्या झाल्यानंतर पक्ष अधिक जोमाने काम करेल. जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल, अशी खात्रीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नव्या कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी निवडताना लोकाभिमुखता हाच निकष लावला जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जो तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला आहे, अशांनाच ही संधी मिळणार आहे. Gunaratna Sadavarte : ‘तुझ्या राज ठाकरेला कायदा काय असतो ते सांगतो’, मनसे प्रवक्ते योगेश खैरे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात खडाजंगी
दापोली मतदारसंघात कोणताही बदल नाही
दापोली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही बदल करू नये, असे राज्यमंत्री योगेश कदम यांचे मत होते. त्यामुळे दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील पदाधिकारी कायम ठेवण्यात आले आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, आता या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेच्या नवे कार्यक्रम आहेत. कोणकोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते, याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.