• Sun. Sep 13th, 2026

विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 20, 2025
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत लवकरच बैठक – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २० : राज्यात ३५८ तालुक्यांमध्ये १०० तालुका क्रीडा अधिकारी पदे मंजूर असून इतर तालुक्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे कार्यभार आहे. पद निर्मितीचा आणि आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाच्या पातळीवर विचाराधीन असून लवकरच तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अधिकारी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत सर्व संबंधित सदस्यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल, असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अमोल मिटकरी यांनी तेल्हारा (जिल्हा अकोला) येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सदाशिव खोत, शिवाजीराव गर्जे, विक्रम काळे, कृपाल तुमाने, उमा खापरे आदींनी सहभाग घेतला.

मंत्री श्री.भरणे म्हणाले, तालुका क्रीडा संकुल येथे सुविधा अपुऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तथापि लवकरच तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांमध्ये संरक्षण भिंत, इनडोअर हॉल, विद्युतीकरण, ड्रेनेज व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, क्रीडा साहित्य आदी सुविधा निर्मितीचे अंदाजपत्रक तयार केले जाईल तसेच राज्य क्रीडा विकास समितीसमोर मान्यतेसाठी ठेवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी क्रीडा मंडळे चांगले काम करीत असतील तेथे क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्यांना देण्याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले. शासकीय इमारतींच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासंबंधीचा दर हा २०१४ सालचा आहे. हा दर बदलण्याची शिफारस करण्यात आली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

0000

बी.सी. झंवर/विसंअ/

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed