Maharashtra Local Body Election : महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे काँग्रेस गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवी रणनीती आखल्याची माहिती मिळत आहे.
नव्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नवी रणनीती
महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक प्रत्येक प्रभागात, वॉर्डमध्ये जाऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की स्वबळावर निवडणूक लढवायची? याबाबतची विचारणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना करत आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेऊन या सर्व निरीक्षकांना एक अहवाल तयार करायचा आहे. तो अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे जाणार आहे.
या अहवालानुसार प्रदेशाध्यक्ष काँग्रेस हायकमांडशी चर्चा करून मग स्वबळाबाबत निर्णय घेणार आहेत. सद्य परिस्थितीला बहुतांश प्रभागातून स्वबळावरच निवडणुका लढाव्यात, असा स्वर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून येत असल्याचं सांगितलं जात आहे.
Shashikant Shinde : शाब्दिक नव्हे, खर्राखुर्रा! अजितदादांची मिश्कील हसत एन्ट्री, शशिकांत शिंदेंना गपचुप चिमटा काढला
निरीक्षक नेमकी काय जबाबदारी पार पाडणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्षांसोबत आघाडी करायची की नाही, याबाबतची विचारणा काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभागात जाऊन करण्यात येणार आहे. याबाबतची जबाबदारी पक्षाने निरीक्षकांना दिले आहे. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
Manikrao Kokate : मोठी बातमी! कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती, राष्ट्रवादीला दिलासा
निरीक्षकांनी प्रत्येक प्रभागात जाऊन त्या ठिकाणची राजकीय समीकरणे, सामाजिक समीकरणे काय आहेत? त्या ठिकाणी सक्षम उमेदवार किती आणि कोण आहेत? याची पाहणी कारायची आहे. तसेच त्या भागातील आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक इतर कमिटांच्या सभासदांची चर्चा करून त्या प्रभागामध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणं योग्य राहील की स्वबळावर निवडणूक लढावावी याबाबतचा अभिप्राय द्यायचा आहे. हा अभिप्राय प्रदेश पातळीवर पाठवण्यात येणार असून त्यावरती प्रदेश पातळीवरून निर्णय घेण्यात येणार आहे.
