Eknath Shinde on Sanjay Raut Claim : एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. “एकनाथ शिंदे यांनी पुण्यात भल्या पहाटे चार वाजता एका हॉटेलमध्ये अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यांचा हा दावा एकनाथ शिंदे यांनी खोडून काढला आहे.
“संजय राऊतांनी दावा केला की, मी अमित शाह यांना भेटलो, तेही पहाटे भेटलो. आता अमित शाह हे आमच्या महायुतीचे नेते आहेत. त्यांना लपूनछपून भेटायचं कारण काय? आम्ही त्यांच्यासारखं लपूनछपून काम करत नाही. आम्ही दिवसाढवळ्या काम करतो. त्यांच्यासोबत पहाटे 4 वाजेची भेट झालीच नाही. त्यांनी त्या भेटीचं वर्णन काय केलंय? म्हणे संभाषण लिहिलं आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका केली. “पूर्वी काला पहाड वगैरे अशी पुस्तकं यायची तशी आता परिस्थिती झाली आहे. मी एक सांगतो, सलीम-जावेद यांच्यासोबत संजय राऊतांची स्पर्धा चालली आहे. शंभर टक्के. कारण ते एवढ्या स्टोऱ्या तयार करतात”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
Ajit Pawar : ‘का रे दुरावा का रे अबोला’, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना टाळलं? व्हिडीओ समोर
महायुतीत शीतयुद्ध आहे का? शिंदे म्हणाले…
यावेळी एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी महायुतीत कोल्ड वॉर सुरु आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर शिंदे यांनी नाही उत्तर दिलं. “कोल्ड वॉर… कोल्ड वॉर… काही आहे का कोल्ड वॉर? एवढ्या उन्हाळ्यात कोल्ड वॉर? इथे सगळं थंडा थंडा कुल कुल आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

