महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीचे फोटोदेखील आता समोर आले आहेत. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळे बदल होणार का? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात उत्सुकता आहे.
दोन्ही भावांची भेट नेमकी कुठे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आज पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहेत. एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू हे एकत्र आलेले बघायला मिळाले. दोन्ही बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने त्यांची भेट होणं हे साहजिक आहे. त्यांच्या या भेटीचे फोटो आता समोर आले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हे एकमेकांशी बातचित करत असताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीदेखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कुटुंबातील एका लग्न कार्यात एकत्र आलेले बघायला मिळाले होते. त्यावेळीदेखील दोन्ही भावंडांची भेट झाली होती. त्यांच्या भेटीचे फोटो त्यावेळी देखील व्हायरल झाले होते. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा त्यांची लग्नानिमित्त भेट घडून आल्याने ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.
दोन्ही भाऊ एकत्र येणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ असले तरी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आतापर्यंत राहिलेले बघायला मिळाले आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. विशेष म्हणजे असं असलं तरीही राज ठाकरे यांच्याकडून अनेकदा उद्धव ठाकरेंना मैत्रीचा हात पुढे करण्यात आलेला आहे. पण उद्धव ठाकरेंनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. याउलट राज ठाकरेंवर टीका केली आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ आतापर्यंत एकत्र आलेले नाहीत. पण दोन्ही भावांनी एकत्र यावं ही दोन्ही भावांच्या पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे कार्यकर्ता आणि जनमताचा विचार करुन ठाकरे बंधू एकत्र येणार का? ते आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल.