• Tue. Mar 10th, 2026
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांना नामांकन, जागतिक वारसा यादीत मिळणार स्थान; मंत्री आशिष शेलारांची माहिती

    Chh. Shivaji Maharaj Fort : आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठेव्याचे आणि वारश्याचे जतन व्हावे, यासाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांनी युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : साऱ्या देशवासीयांचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जनमनात आस्था आहे. त्यांच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व्हावे, अशी इतिहासकारांसोबतच राजकीय मंडळी आणि देशवासीयांची धारणा आहे. त्याबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जाते. महापराक्रमी शिवाजी महाराजांच्या या ठेव्याचे आणि वारश्याचे जतन व्हावे यासाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासह युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली आहे.

    सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे. आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना हे शिष्टमंडळ भेटले. ‘महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या शिवछत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे,’ अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

    दरम्यान, याबाबतीत पूर्णपणे निर्णय होणे बाकी असून त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली, असे अॅड आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.

    शिवरायांच्या जन्मभूमि असलेल्या शिवनेरी किल्ल्यापासून ते स्वराज्याची पहिली आणि दुसरी राजधानी असलेल्या राजगड आणि रायगड किल्ल्यांसह १२ किल्लांचा जागतिक यादीत स्थान मिळण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी विभागाने पहिले पाऊल टाकले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराजांच्या १२ किल्ल्यांना स्थान मिळवून देण्यासाठी ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India)संकल्पनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार शिष्टमंडळाने हा प्रस्ताव सादर केला. याबद्दल आशिष शेलारांनी प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी जाऊ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed