Manikrao Kokate News : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अजित पवार गटाचा दुसरा आमदार आणि मंत्री अडचणीत सापडला आहे.
माणिकराव कोकाटेंना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यावर आता ते हायकोर्टात अपील करू शकतात. जर या निर्णयाला स्टे मिळाला तर काही अडचण नाही, परंतु स्टे नाही मिळाला तर त्यांच्या सदस्यत्त्वाला धोका निर्माण होऊ शकतो. माणिकराव कोकाटे यांच्यावर ४२० कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे हे आमदार होते तर तुकाराम दिघोळे हे त्यावेळी मंत्री होती. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण कोर्टात सुरू होते. यावर आता नाशिक जिल्हा न्यायालयाने निर्णय देत कोकाटेंना झटका दिला आहे.
दादांचा दुसरा शिलेदार अडचणीत
अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. धनंजय मुंडेंविरोधात शिंदे सरकारमध्ये कृषीमंत्री असताना घोटाळा केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता दादा गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दणका दिला आहे. माणिकराव कोकाटे जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतात. हे प्रकरण कोकाटेंच्या अंगलट येतं की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

