• Thu. Sep 17th, 2026

Mumbai-Nashik Highway : देवदर्शन करुन परतताना आटगांव येथे भीषण दुर्घटना, एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत, सात जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर मन हेलावणारी घटना घडली आहे. देवदर्शन करुन परतणाऱ्या भाविकांच्या कारने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. मृत, जखमी एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश गायकवाड, ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर आटगांव इथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 जण जखमी झाले आहेत. हे सातही जणदेखील एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघाताच्या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त कुटुंबिय हे देवदर्शन करुन मुंबईच्या दिशेला परतत होतं. हे कुटुंब मुंबईच्या जोगेश्वरी येथे वास्तव्यास होतं. या अपघाताच्या घटनेत अवघ्या 1 वर्षीय आणि 8 वर्षीय चिमुकल्यांचा देखील मृत्यू झाल्याने दु:ख व्यक्त केले जात आहे.

नेमकं काय घडलं?

रस्त्यापासून काही फुटावर बंद पडलेल्या ट्रेलरला मागून कारने दिलेल्या धडकेत कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आटगांव येथे घडली. तर, या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. यातील तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे यांनी दिली. मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील असून हे कुटुंब त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन मुंबईला परतत असताना हा भीषण अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesShiv Sena Case : चिन्हाचा विषय तेव्हा राजकीय पक्षच महत्त्वाचा, सुप्रीम कोर्टाची मोठी टिपण्णी, सुनावणी उत्कंठावर्धक वळणावर

जयस्वाल कुटुंब मंगळवारी देवदर्शनाला निघालेलं

मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणारे जयस्वाल कुटुंब मंगळवारी रात्री साडेबारा वाजता जोगेश्वरी येथून कारने त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघाले. त्र्यंबकेश्वरला पाहोचल्यानंतर सकाळी ९ वाजता या कुटुंबाने दर्शन घेतले. नंतर पुन्हा हे कुटुंब कारने मुंबईला जाण्यासाठी निघाले. कारमधून एकूण ११ जण प्रवास करीत होते. वाटेत त्यांनी जेवण केले. कार मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आटगांव येथे आल्यानंतर या कारने रस्त्यापासून दहा ते १५ फूट अंतरावर बंदावस्थेत उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिली.

Maharashtra TimesAaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं, म्हणाले, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने नाव जोडण्याचा प्रयत्न

जखमींवर उपचार सुरु

या भीषण अपघातांमध्ये कारमधील चौघांचा मृत्यू झाला असून मृतांची वय ८, १, २८, ३५ वर्ष असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली. तर, तीनजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अन्य चार जखमींवर शहापूर तालुक्यातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra TimesSantosh Pandit Bail : कोर्टात जोरदार युक्तिवाद, अखेर संतोष पंडित यांना जामीन मंजूर; पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

अपघात नेमका कशामुळे झाला?

कारचे स्टेअरिंग जाम झाल्याने ही कार अनियंत्रित होऊन हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज शहापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नागरगोजे यांनी व्यक्त केला आहे. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.