• Sun. Jun 7th, 2026
    चौथ्यांदा आमदार झाले असते; शिंदेंनी सांगितली अंदर की बात; राजन साळवी मिशीतल्या मिशीत हसले

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवींनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवींनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सेनेत प्रवेश केला. ज्या पक्षाच्या विचाराला लागली वाळली, तिथे कसा राहील राजन साळवी, अशी शाब्दिक कोटी करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

    राजन साळवी हा ढाण्या वाघ पुन्हा गुहेत आलेला आहे, अशा शब्दांत शिंदेंनी माजी आमदारांचं पक्षात स्वागत केलं. राजन साळवींनी शिवसेनेत अनेक पदं भूषवली. ते नगराध्यक्ष होते, जिल्हाप्रमुख होते, तीन टर्म आमदार आहे. आता चौथ्यांदाही झाले असते. मला किरण आणि उदय सारखे सांगत होते. त्यांना पक्षात घ्या आणि विधानसभेचं तिकीट द्या. पण काही गोष्टींसाठी योगायोग जुळून यावा लागतो, असं शिंदे म्हणाले. तेव्हा मागे उभे असलेल्या राजन साळवींनी नशिबाचा भाग असतो म्हणत मंदस्मित केलं.
    शिवसेना प्रवेशाआधी साळवींनी ताकद दाखवली; माजी आमदाराचा नारा भाजपसह ठाकरेंची चिंता वाढवणारा
    किरण सामंतला आमदारकीची संधी होती. पण तो साळवींसाठी आग्रही होता. हीच बाळासाहेबांची आणि आनंद दिघेंची शिवसेना आहे. त्यांचीच शिवसेना आपण सगळे पुढे नेत आहोत. इकडे कोणी नेता नाही. इकडे सगळे कार्यकर्ते. मी पण कार्यकर्ताच आहे. राजा का बेटा राजा नही बनेगा. काम करेगा वहीं राजा बनेगा अशी आपल्याकडे पद्धत आहे. नाही तर काही जण सहकाऱ्यांना नोकर, घरगड्याची वागणूक देतात. त्यामुळे मी उठाव केला, संघर्ष केला, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.

    साळवींच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करणाऱ्या किरण सामंत यांचं विशेष कौतुक केलं. ‘मी किरण सामंत यांचं अभिनंदन करतो. साळवींच्या पक्षप्रवेशाआधी मी त्यांना विचारलं होतं. त्यावर पक्ष, संघटना मोठी होत असेल तर आम्हाला आनंद आहे. कारण आमची किंमत त्याच पक्षामुळे आहे, असं किरण सामंत मला म्हणाले, असा उल्लेख शिंदेंनी केला.
    …तर भाजपला केंद्रात शिवसेनेसह कोणत्याच मित्रपक्षांची गरज नाही; सर्व्हेत आश्चर्यजनक आकडे
    शरद पवारांनी दोनच दिवसांपूर्वी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन एकनाथ शिंदेंचा सन्मान केला. त्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेनं पवारांवर तोंडसुख घेतलं. त्यावरही शिंदेंनी भाष्य केलं. ‘एका मराठी माणसाकडून मराठी माणसाचा सन्मान झाल्यावर खरंतर अभिमान वाटायला हवा होता. पण त्यांचा किती जळफळाट झाला. तुम्ही तुमची रेष मोठी करा ना. त्यांची अवस्था आता शोलेतील असरानीसारखी झाली आहे. आधे इधर, आधे उधर अशी परिस्थिती आहे. आता साळवी इकडे आल्यावर शिव्याशाप देतील. पण आपण त्यांना कामातून उत्तर देत राहायचं,’ असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed