Devendra Fadnavis: प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारण्याचे उद्दिष्ट असून, प्रथम प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील दहा जिल्ह्यांत १० ‘उमेद मॉल’ उभारले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
हायलाइट्स:
- ‘सरस’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी घोषणा
- पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांत होणार उभारणी
- २५ लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट
‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, “उमेद’च्या माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरातील महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. बचत गटांची उत्पादने खूप चांगली असतात, पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठीच जिल्हा परिषदेच्या परिसरात ‘उमेद अभियाना’च्या माध्यमातून मॉल उभारण्यात येतील. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर १० जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येतील’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी’ योजना आणली आहे. राज्यात लवकरच २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा सरकारचा संकल्प आहे. नजीकच्या कालावधीत एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचा आमचा निर्धार आहे’, अशी माहिती त्यांनी दिली. लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी उपस्थित महिलांना दिली.
‘महालक्ष्मी सरस’ २३ फेब्रुवारीपर्यंत बीकेसीत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, हातमागावरील कापड, लाकडी हस्तकला, बंजारा आर्ट, वारली आर्टच्या वस्तू, दागिने, लाकडी खेळणी आणि इतर राज्यांतील दुर्मीळ वस्तू उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात ५००हून अधिक स्टॉल लागले असून त्यापैकी ९० फूड स्टॉल आहेत.

