ठाकरे गटाचे नेते आणि सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक असेलल्या संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी शिंदेंच्या आमदारासोबत झालेल्या संभाषणाबद्दल माहिती देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कशाप्रकारे कोंडी झाली हे सांगितलं आहे.
अग्रलेखात काय म्हटलंय?
शिंदे गटाचे एक त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले. त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन गोंधळ वाढवला. “शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही.”
“मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेले नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय?”- राऊत
“ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत.” – आमदार
“शिंदे यांना धक्का बसला आहे काय?” – राऊत
“ते मनाने कोलमडले आहेत.” – आमदार
“का? काय झालं?” – राऊत
“निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते. शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंदे यांना वाटते”- आमदार
या आमदाराने पुढे माहिती दिली ती महत्त्वाची. “शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टाप केले जात आहेत असे शिंदे यांना खात्रीने वाटते व दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे.”
दरम्यान, संजय राऊतांना विमानामध्ये भेटलेला आमदार कोण? खरंच शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुगलबंदी सुरू आहे का? असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत. यावर एकनाथ शिंदे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.