• Thu. Jun 18th, 2026

    सुरेश धसांचे मनधरणीचे प्रयत्न, कलेक्टरला फोन, बजरंग बाप्पाही मदतीला, पण जरांगे ऐकेनात, म्हणाले, ‘इतकं वेड्यात…’

    सुरेश धसांचे मनधरणीचे प्रयत्न, कलेक्टरला फोन, बजरंग बाप्पाही मदतीला, पण जरांगे ऐकेनात, म्हणाले, ‘इतकं वेड्यात…’

    मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं या विनंतीसाठी भाजप नेते सुरेश धस हे आज अंतरवली सराटी गावात त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. सुरेश धस यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणेदेखील होते. दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची राज्य सरकारकडून दखल घेतली जात नाही, असं मराठा आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी काल जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावापासून 3 किमी अंतरावर असलेल्या वडीगोद्री गावात धुळे-सोलापूर महामार्ग रोखला होता. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारच्या पातळीवर घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज अंतरली सराटी गावात जावून मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी सुरेश धस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे हेदेखील होते. दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले.

    मनोज जरांगे यावेळी सुरेश धस यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थित नव्हते. त्यामुळे सुरेश धस यांनी बजरंग सोनवणे यांना मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानंतर सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. यावेळी बजरंग बाप्पा यांनी मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. पण ते देखील अयशस्वी ठरले. त्यामुळे बजरंग बाप्पा यांनी सुरेश धस यांना जरांगेंची पुन्हा समजूत काढण्याची विनंती केली. यावरुन मनोज जरांगे यांनी दोन्ही नेत्यांना सुनावलं. “ते म्हणतात तुम्ही बोला. तुम्ही त्यांना बोलता तुम्ही बोला. इतकं वेड्यात काढायला नको”, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी सुनावलं.

    मनोज जरांगे यांचे सुरेश धस यांना सवाल

    निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडे गॅजेट आहेत. तीनही गॅजेट आहेत. ते कधी लागू करणार? असा प्रश्न यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना विचारला. त्यावर सुरेश धस यांनी लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.

    यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची मागणी कधी मान्य करणार? असा प्रश्न विचारला. तसेच आपल्याला आता पुन्हा मुंबईला आंदोलनासाठी जावं लागू शकतं, असं समाजाचं म्हणणं आहे, असंही सूचक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. यावेळी सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांना विचारुन त्यांच्या मागणीचा सर्व ड्राफ्ट लिहून घेतला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed