• Sat. Jun 6th, 2026
    कराडचा पाय आणखी खोलात; ईडीच्या एन्ट्रीची शक्यता, ‘त्या’ याचिकेनं फास आणखी आवळला

    बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते अमेय तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वाल्मिक कराड हा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे. या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांचे नाव सातत्यानं समोर येत असल्यानं पोलीस तपासाला मर्यादा असल्याचं तिरोडकर यांनी याचिकेत नमूद केलं आहे.

    संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीच्या माध्यमातून सुरु आहे. त्याशिवाय निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीदेखील करण्यात येणार आहे. कराड हा मुंडे यांच्या जवळचा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणात सातत्यानं समोर येत आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मर्यादा असल्याचा मुद्दा याचिकेतून मांडण्यात आला आहे. त्याच कारणामुळे स्वायत्त संस्था असलेल्या ईडीनं या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे.
    श्रीलंकन नौदलाच्या गोळीबारात ५ भारतीय मच्छिमार जखमी; कारवाईनंतर लंकेकडून संतापजनक स्पष्टीकरण
    धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित अनेक कंपन्यांचे व्यवहार, मालमत्ता, संपत्ती यांची यादी समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्याची मागणीदेखील याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

    धनंजय मुंडे यांचं पानही ज्यांच्याशिवाय हलत नाही असे वाल्मिक कराड, असा परिचय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात करुन दिला होता. त्यावरुन कराड आणि मुंडे यांचे घनिष्ठ समोर अधोरेखित झाले. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा आहे. मुंडे मंत्रिमंडळात असताना त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर पोलीस कारवाई कसे करणार, असा प्रश्न सातत्यानं विचारला जात आहे.
    बाप बसलाय इथे! ऑडिओ क्लिपमध्ये कराडची फुशारकी; महिला पोलिसासोबतच्या कॉलची क्लिप व्हायरल
    वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. मुंडे यांचा राजीनामा न घेतल्यास कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे. दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी मुंडे आणि कराड यांच्या संबंधांचे अनेक पुरावे दमानिया यांनी दिले. यानंतर आज अजित पवार यांनी मुंडे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. जे दोषी नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच नाही, असं अजित पवार म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed