संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणामध्ये मुख्य आरोपींना वाचवण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याबाबत बोलताना महायुती सरकारवर टीका केली आहे.
बदलापूरची घटना घडली त्यावेळी अनेकांनी संशय व्यक्त केला होता की तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात येत आहे का? कारण ज्या पद्धतीने शिंदेला मारण्यात आलं, त्याचा फेक एन्काऊंटर करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्याची बंदुक काढून घ्यायला त्याला प्रशिक्षण लागतं. बंदुक लॉक असते, त्याने फायर करण्याचा प्रयत्न केला आणि बचावासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या असं दाखवण्यात आलं. त्यामुळे तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला. कारण बंदुकवर शिंदेच्या हाताचे ठसेसुद्ध नव्हते. त्यामुळे खरा आरोपी कोण? अक्षय शिंदे की तुषार आपटे असा सवाल अनिल देशमुख यांनी केला. तुषार आपटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे
संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली. जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे लवकरात लवकर आरोपींना शासन करावे. एक महिना सातत्याने आरोपींची नावे घेतली पण शासनाने हात लावला नाही. महिन्यानंतर वातावरण पेटल्यानंतर शासनाने काही लोकांना अटक केली आहे. सरकारने लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. कारण लोकांना सरकारवरच संशय येत आहे. महाराष्ट्राचे पोलीस सक्षम आहेत, चांगले अधिकारी असून त्यांना मोकळीक दिली पाहिजे. त्यांच्यावर दबाव असेल तर चौकशी कशी होणार? देशमुखांची हत्या झाल्यावर लोकं सांगत असताना त्यांना हात लावला नाही. त्यामुळे कोणाला तरी वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून पाठिशी घालत असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे.