• Thu. Jan 23rd, 2025
    मुंबईत रंगणार बहुप्रतीक्षित माण देशी महोत्सव २०२५, तारीख आणि स्थळ जाणून घ्या

    याच सोहळ्यात माणदेशी महिलांनी १० लाख महिला सक्षमीकरणाचा मैलाचा टप्पा गाठल्याचे घोषित करण्यात येईल. तसेच मंगळागौर कार्यक्रम सादर केला जाईल.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित माण देशी फाऊंडेशन आयोजित “माण देशी महोत्सव २०२५’’ हा अस्सल मराठमोळ्या मातीचा महोत्सव ५ फेब्रुवारीपासून परळच्या नरे पार्क मध्ये रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवार ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि एच. टी. पारेख फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झिया ललकाका, एचएसबीसीच्या `परोपकार व शाश्वतता’ विभागाचे जागतिक प्रमुख अलोका मजुमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सोहळा गजी नृत्याने सुरू होईल. याच सोहळ्यात माणदेशी महिलांनी १० लाख महिला सक्षमीकरणाचा मैलाचा टप्पा गाठल्याचे घोषित करण्यात येईल. तसेच मंगळागौर कार्यक्रम सादर केला जाईल.

    महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता मुलींची माणदेशी कुस्ती आणि बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धा पार पडेल. शुक्रवार, सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता माणदेशी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एचएसबीसीच्या `परोपकार व शाश्वतता’ विभागाचे जागतिक प्रमुख अलोका मजुमदार उपस्थित असतील. सायंकाळी सात वाजल्यापासून प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते आपली संगीत रजनी सादर करेल. या कार्यक्रमास प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित असतील. शनिवार, ८ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून अभंग सादरीकरण होईल. तर रविवार, ९ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून समारोप सोहळ्यास सुरुवात होईल.

    ग्रामीण उद्योजकता, पारंपारिक हस्तकला आणि स्थानिक संस्कृतीचे अनोखे मिश्रण असलेल्या या उत्सवाची मुंबईकर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. ५ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान, वेळ – सकाळी १०.३० ते रात्री ९.३० पर्यंत परळच्या नरे पार्क वर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात ग्रामीण महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन आणि कुस्ती सारख्या लाल मातीतल्या खेळाचा आनंद घेता येईल, अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना गाला सिन्हा यांनी दिले.

    १९९६ मध्ये श्रीमती चेतना गाला सिन्हा यांनी माण देशी फाऊंडेशनची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील माण परिसरात माणदेशी महिला सहकारी बँक स्थापून चेतना गाला सिन्हा यांनी परिसरातील महिलांना आर्थिक दृष्ट्‍या सक्षम करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. यांची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली. जागतिक पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड इकनॉमिक फोरम मध्ये चेतना सिन्हा यांनी या ग्रामीण महिलांचे प्रतिनिधीत्व केले. माण देशी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वयं-रोजगाराचे धडे दिले जातात. उद्योजकता विकास कार्यक्रम कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे माण देशी फाऊंडेशनच्या हजारो महिला उद्योजिका म्हणून कार्यरत आहेत. या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी. तसेच ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडावे, खाद्य संस्कृतीचा आनंद घेता यावा या उद्देशाने माणदेशी महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात झाली.

    माण देशी महोत्सव २०२५’ ची वैशिष्ट्ये:

    1. रुचकर भोजन दालन : महोत्सवाचे एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणून, रुचकर भोजन दालन असतील, जिथे पाहुणे ग्रामीण महाराष्ट्राच्या पारंपारिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतात. गाव्ररान मटण आणि भाकरी, थालिपीठ, कोल्हापुरी मिसळ, मासवाडी, आणि सिल्वासा येथील दांगी पदार्थ यांसारख्या पदार्थांची चव घेतली जाऊ शकते.
    2. हस्तकला प्रदर्शन व विक्री : महोत्सवात अप्रतिम ग्रामीण कलेचे प्रदर्शन पाहता येईल. जेन आणि घोंघडी (पारंपारिक दागिने बनवणे), कोल्हापुरी चपला तयार करणे. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना, विशेषत: मुलांना मातीचे मडके बनविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
    ३. कला कार्यशाळा: महोत्सवात हस्तकला कार्यशाळा भरवण्यात येईल. जिथे पाहुणे माण देशी महिलांकडून पारंपारिक कलेची प्रशिक्षण घेऊ शकतात. या कार्यशाळांमध्ये वारली पेंटिंग आणि लाइव्ह दागिने बनवण्याच्या सत्रांचा समावेश असेल.
    ४. सांस्कृतिक कार्यक्रम: ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी महोत्सवात गज्जी नृत्य आणि कुस्तीचे मुकाबले यांचा समावेश असेल. त्याशिवाय, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे आपल्या संगीताने महोत्सवात रंग भरतील.
    ५. शेतकऱ्यांच्या उत्पादनांचा बाजार: महोत्सवात माण देशीच्या शेतकऱ्यांकडून थेट विक्रीसाठी ताजे उत्पादन विकले जाईल. तूप, मध, गूळ, डाळिंब, आणि ताजे स्ट्रॉबेरी अशी नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने पाहुण्यांना खरेदी करता येतील.
    ६. ग्रामीण संस्कृतीचा अनुभव: महोत्सवात ग्रामीण जीवनशैलीचा परस्पर अनुभव घेता येईल. यामध्ये नंदी बैल, पिंगला नृत्य, यांचा समावेश असेल, ग्रामीण जीवनशैली आणि परंपरेची उत्कृष्ट छायाचित्रे घेण्यासाठी विशेष सेल्फी पॉइंट्स सज्ज असतील.
    ७. महिला उद्योजकांचा सन्मान: माण देशी महोत्सव २०२५ मध्ये माण देशी फाऊंडेशनच्या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षम झालेल्या 10 लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात गौरविण्यात येईल.

    माण देशी महोत्सव २०२५ केवळ एक कार्यक्रम नाही, तर ग्रामीण महिलांचे सामर्थ्य, सर्जनशीलता आणि स्थिरतेचा उत्सव आहे. हा महोत्सव मुंबईकरांना ग्रामीण भारताशी जोडून, त्यांना संस्कृतीचे धडे देऊन, त्या महिला उद्योजकांचे समर्थन करण्यासाठी एक अद्वितीय संधी प्रदान करतो.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed