• Wed. Jan 22nd, 2025
    Nashik News: पालकमंत्रिपदाचा तिढा वाढला; दादा भुसेंसाठी शिंदेंच्या घरासमोर घोषणा, भाजप दावा सोडणार?

    Nashik Guardian Minister Post Issue: नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा वाढतच चालला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण, शिवसेनेच्या विरोधानंतर त्याला स्थगिती देण्यात आली.

    महाराष्ट्र टाइम्स

    नाशिक: नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असली तरी, पदावरील हक्क सोडायला भाजप तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्रिपदी दादा भुसे यांची नियुक्ती व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढवला आहे. शिवसैनिकांनी मंगळवारी (दि.२१) मुंबई गाठत शिंदे यांच्या बंगल्यासमोर दादा भुसेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच वाढल्याचे चित्र आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस दौऱ्यावर जाण्यापूर्वी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. पण नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजीनाट्य सुरू झाले. राज्यमंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळालेले असताना शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांना नाशिक जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भुसेंऐवजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकत्व देण्यात आले. शिवसेनेच्या विरोधानंतर मुख्यमत्र्यांनी त्याला स्थगिती दिली.

    यासाठी आता शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. शालेय शिक्षणमंत्री भुसे यांच्याकडे नाशिकचे पालकत्व द्यावे अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली. शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला. स्थानिक समस्या आणि आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनाच पालकमंत्री करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, गणेश कदम, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.

    भाजपची कोंडी

    रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यास नाशिक शिवसेनेला द्या, अशी खेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीनेही रायगड शिवसेनेला दिल्यास नाशिक आम्हाला द्या, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडवरून आता राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटातच रस्सीखेच सुरू झाली असून, यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवला, तर भाजपला नाशिकचे पालकमंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता आहे.

    महायुतीतील तीनही घटक पक्षांमध्ये मंगळवारी (दि.२१) खल सुरूच होता. नाशिकवरील दावा सोडण्यास भाजप तयार नसल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. त्यातही एका वर्षानंतर येथे सिंहस्थ आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत नाशिकचे पालकमंत्रिपद सोडायचे नाही, असा पवित्रा भाजपने घेतल्याचे समजते. दुसरीकडे राष्ट्रवादीही आपला हक्क सोडायला तयार नाही. शिंदे गटाने भुसेंसाठी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed