• Sun. Jan 19th, 2025
    धनंजय मुंडेंसाठी कौतुकोद्गार, छगन भुजबळांवर मात्र मौन; राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता शिबिरातील अजित पवारांचं विधान काय सांगतं?

    NCP Shirdi Camp Ajit Pawar Speech : शिर्डी साईबाबांच्या नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सध्याच्या घडीला तप्त असलेला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा ही अजित पवारांनी भाषणात आणला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अहिल्यानगर : शिर्डी साईबाबांच्या नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले आहे. यामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आमदार आणि खासदारांनी हजेरी लावली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सध्याच्या घडीला तप्त असलेला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा ही अजित पवारांनी भाषणात आणला. याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडेसाठी अजित पवारांनी व्यासपीठावरुन कौतुकोद्गार काढले आहेत. मात्र याचवेळी त्यांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांनी मौन बाळगले.

    वास्तविक कार्यकर्ता शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे हे दोघेही उपस्थित नव्हते. त्यामुळे संमेलनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी दोन्ही नेते शिर्डीत येतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र हे दोघेही रविवारी कार्यकर्ता शिबिरासाठी उपस्थिती लावली होती.

    भुजबळ कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, काल प्रफुल्ल पटेल माझ्याकडे आले होते. दोन-तीन तास आम्ही चर्चा केली. कार्यकर्ता शिबिराला यावे, अशी विनंती त्यांनी केली होती. तेवढ्यात मला सुनील तटकरे यांचा फोन आला की, कृपया शिबिराला या. म्हणूनच थोडा वेळ काढून मी येथे आलो. या बहाण्याने साईबाबांचेही दर्शन घेतले होते. अजित पवार यांच्यावरील नाराजीच्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले की, ही पक्षाचे कार्यकर्ता शिबिर आहे, कोणा एका व्यक्तीचे नाही.

    दरम्यान बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी करण्यात आलेल्या गंभीर आरोपांना तोंड देत धनंजय मुंडे यांनी प्रथमच पक्षाच्या व्यासपीठावरुन स्पष्टीकरण दिले आहे. ‘मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे,’ असे मुंडे म्हणाले. तर बीड म्हणजे बिहार आणि परळी म्हणजे तालिबान अशी भयंकर खोटी प्रतिमा निर्माण केली जात आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायलाच हवी, अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे.

    तर अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडे यांच्या भाषणाचे सर्वांसमक्ष कौतुक केले. गेल्या काही दिवसांपासून निर्माण होत असलेले वादळ शांत करण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले आहे, असे पवार म्हणाले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कामात जुंपून घेण्याचे सांगत पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन देखील केले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed