• Wed. Jan 15th, 2025

    आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 14, 2025
    आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    बुलढाणा, दि. १३ : गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, त्यांच्यावरही चांगले उपचार झाले पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना संपूर्ण देशामध्ये राबवली जात आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

    राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि चिखली तालुक्यातील सवणा येथे मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही आरोग्य शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सिंदखेड राजा येथील आरोग्य शिबिरात माजी आमदार शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार, मुख्याधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

    तर सवणा येथील आरोग्य शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, गजानन मोरे, शिवाजीराव देशमुख, विलास घोलप, नियोजन समिती अध्यक्ष कैलास भालेकर, माजी.जि.प.सदस्य शरद हाडे, संजय भुतेकर उपस्थित होते.

    यावेळी शिबीरार्थींना मार्गदर्शन करतांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, या देशातील गोरगरीब जनतेला त्यांच्याच भागामध्ये चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा कशाप्रकारे मिळेल या दृष्टिकोनातून राज्य शासनाकडून प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील आणि राज्यातील आरोग्याची सेवा सक्षम करून लोकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्यातील राज्य शासन कटिबध्द आहे.  गोरगरीब जनतेला महानगरातील हॉस्पिटलमध्येही आरोग्य उपचार घेता यावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना राबविली जात आहे. या योजनेचा सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.

     या शिबीरामध्ये अस्थिरोग तज्ञ, कान नाक घसा, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार तज्ञ, कर्करोग तज्ञ, बालरोग तज्ञ, पोटविकार तज्ञ, मानसिक आजार तज्ञ, हृदयरोग तज्ञ, मेंदु तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. याशिवाय नेत्र तपासणी, मोफत चष्मे आणि औषधीचे वाटप करण्यात आले. या शिबिरात अनेक गरजूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed