• Tue. Jan 14th, 2025

    टेकड्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 13, 2025
    टेकड्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना – महासंवाद

    महानगरपालिकेशी संबंधित विषयांसदर्भात २३ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन

    पुणे, दि.13: पुणे शहर परिसरात 17 टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांनासोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. टेकड्यांवरील अनाधिकृत बांधकामावरही कारवाई करावी, असे निर्देश देत महानगरपालिकेशी संबंधित विषयांसदर्भात 23 जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    पुणे शहरातील टेकड्यांची सुरक्षा, त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वनभवन येथे आयोजित आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या तीन घटनांनतर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा मंत्री श्री. पाटील यांनी घेतला. यावेळी उपवसंरक्षक महादेव मोहिते, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ, नागरिक उपस्थित होते.

    श्री. पाटील म्हणाले, कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर सुमारे 6 हजार 500 वृक्षांची लागवड केली होती. त्यांना आग लावून सुमारे 2 हजार 500 वृक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.

    टेकड्यावरील झाडांची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी  तणांची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. संरक्षक भिंतीची जलदगतीने कामे पूर्ण करावे. वन क्षेत्र संरक्षित करावेत, प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. टेकड्यांवरील झाडांच्या देखभालीसाठी टेकड्यावरील ठिकाणे निश्चित करुन उच्चक्षमतेचे सोलारयुक्त सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकाची संख्या 2 वरुन ८ करावी. त्यांना गस्त घालण्यासाठी लागणाऱ्या दुचाकी, सौर दिवे आदी बाबींकरीता लागणारा निधी उपलब्ध करुन देण्याचा येईल, असे श्री. पाटील म्हणाले.

    श्री. मोहिते यांनी टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच काही विषय महापालिकेशी संबंधित असल्याने महानगर पालिका आयुक्तांसोबत बैठक लावण्याची त्यांनी विनंती केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed