Beed Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग येथे आज एक आक्रमक आंदोलन पाहायला मिळालं. येथे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण गावाने आंदोलन केलं, तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे थेट टाकीवर चढले.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आणि पोलीस अधिक्षकांनी समजूत काढल्यानंतर जवळपास दोन तासांनी ते टाकीवरुन खाली उतरले. यावेळी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी ही पहिल्यांदा आक्रमक झालेली दिसली. एरवी अत्यंत शांतपणे न्यायाची मागणी करणारी वैभवी आज पहिल्यांदा चिडलेली दिसली.
Beed Santosh Deshmukh: धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर; तुम्ही खाली या, जरांगेंनी समजावलं, दोघांच्या डोळ्यात पाणी तरळलं
वैभवी देशमुख काय म्हणाली?
माझ्या पप्पांना तर यांनी रस्त्यावरुन उचललं. पण माझा काका घरी असताना पोलिसांचा ताफा घराशेजारी असताना माझा काका हे करतोय, म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय. आज माझे पप्पा गेले, काकालाही गमावलं तर आम्ही काय करायचं. जसा आज काका वर गेलाय, इथून पुढे जर आरोपींना अटक नाही झालं तर आम्ही सर्व वर जाईल, आम्हाला काही झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. आज आमचा एक माणूस गेला आहे तरी पोलीस आरोपींना पकडत नाहीये. जेव्हा कुटुंबातील सर्व जातील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील, अशी संतप्त प्रतिक्रिया वैभवी देशमुखने दिली.
आम्ही पोलिसांकडे इतकीच मागणी करतोय की या प्रकरणात काय घडतंय ते आम्हाला कळालं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र न्याय मागतोय त्यांनाही कळालं पाहिजे. पोलीस प्रशासनाची प्रक्रिया काय चालली आहे, हे आम्हाला अद्यापही माहिती नाही. आम्ही सगळ्यांनी जीव दिल्यानंतर यांचे डोळे उघडतील का?
पोलीस घरासमोर असतानाही माझा काका वर चढतोय, तरी यांना कसं माहिती नाही. माझ्या काकाचंही अपहरण झालं असतं त्याचं काही झालं असतं तर पोलीस प्रशासनाचा उपयोग काय आहे आम्हाला. आम्ही शांततेत न्याय मागत होतो. तरी न्याय भेटत नाही. जेव्हा कुटुंबातील कोणी असं करेल तेव्हा तुम्ही आम्हाला न्याय द्याल का?, असा उद्विग्न प्रश्नही तिने विचारला.
Santosh Deshmukh Case: आमचा माणूस गेला, आम्ही दु:ख करायचं की रस्त्यावर न्याय मागत फिरायचं, सरपंचाच्या लेकीचा उद्विग्न सवाल
आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही काय करायचं. आमच्या घरातला सदस्य गेलाय, त्याचं दु:ख करायचं की न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं. शांततेत करतोय तरी न्याय मिळत नाही आज ३५ दिवस झाले आहेत, अशी आक्रमक प्रतिक्रिया तिने दिली.