विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात बैठकांना सुरुवात झाली आहे. पराभवाचं विश्लेषण करुन पुढील वाटचालीच्या दृष्टीनं शरद पवार आखणी करत आहेत.
शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना, मागण्या यावेळी जाणून घेतल्या, काही कार्यकर्तेदेखील या बैठकीला हजर होते. यावेळी एका कार्यकर्त्यानं शरद पवारांसमोर प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. यावेळी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तिथेच उपस्थित होते. त्यांच्यासमोरच कार्यकर्त्यानं भूमिका मांडली. सगळ्या सेल, विभागांचे पदाधिकारी, अध्यक्ष बदला, अशी मागणीदेखील या कार्यकर्त्यानं केली.
मोदींची याचिका फेटाळली, ठाकरेंना जोरदार धक्का; हायकोर्टाकडून महायुतीला मोठा दिलासा
‘पक्षाला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळायला हवा. संघटनात्मक बदल पक्षासाठी गरजेचे आहेत. नवा प्रदेशाध्यक्ष मराठेतर असावा. त्याचा पक्षाला फायदा होईल. नवा प्रदेशाध्यक्ष पक्षाला वेळ देणारा असावा,’ अशी अपेक्षा कार्यकर्त्यानं शरद पवारांकडे व्यक्त केली. ‘जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलण्यात यावेत. सगळ्या आघाड्या, विभागांचे अध्यक्षदेखील बदलले जावेत,’ अशी मागणी कार्यकर्त्यानं केली.
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे केवळ १० उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात रोहित पवार, रोहित पाटील या तरुण आमदारांचा समावेश आहेत. रोहित पाटील अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झाले आहेत. पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीनं या दोघांवर मोठी जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
लोक माझे सांगती वाचा! पवारांचे खासदार फोडायला पवारांचाच दाखला; सांगितला जातोय ८६चा किस्सा
शरद पवार संघटनात्मक फेरबदल करत भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचं अजित पवार म्हणाले. ‘माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. माझा पक्ष, माझं चिन्ह वेगळं आहे. तो त्यांचा अंतर्गत वेगळा आहे. त्याबद्दल निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. त्यात लुडबूड करण्याचा काडीमात्र अधिकार मला नाही,’ असं अजित पवारांनी म्हटलं.