Beed Crime News : बीडमधील परळी तालुका चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ओळखला जाणारा तालुका आता गुन्हेगारीच्या घटनांमुळे समोर येत आहे. अशातच परळीमधील गेल्या वर्षातील मृतदेहांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ६६ मृतदेह आढळून आले आहेत, त्यापैकी ६४ मृतदेहाची ओळख पटलीय, तर २ मृतदेहाची ओळख पटली नाही. त्याचप्रमाणे परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण १७ मृतदेह आढळले असून सर्वांची ओळख पटली आहे. तर परळी संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत २६ मृतदेह आढळले आहेत. त्यातील २१ मृतदेहाची ओळख पटवण्यात आलीय, तर ४ मृतदेहाची ओळख पटली नाही. तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात १०९ मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. दरम्यान दर ३ दिवसांनी १ अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे.
बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. मोठ्या कंपन्या तिथे जात असल्याने तिथे लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी स्थानिकांमधील वर्चस्वाची लढाई एक महत्त्वाचं कारण ठरत आहे. पुण्यातील मुळशी पॅटर्न जसा समोर आला होता तसा बीड पॅटर्न होताना दिसत आहे. पवनचक्की कंपन्या, राख, जमीन बळकावणे त्यासोबतच राजकीय हेतूनेसुद्धा काही हत्या झाल्याचं आता उघड झालं आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. या प्रकरणामध्येही पवनचक्की कंपनी निमित्त ठरली आहे. ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार मिळत असला तर एक गट वर्चस्वाच्या लढाईसाठी तरूणांचा वापर करून घेत आहे. देशमुखांच्या हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सोडला दुसरी मुले ही २१ ते २६ या वयोगटातील आहेत. त्यामुळे तरूणांना योग्य मार्गदर्शकाची गरज आहे.