chatrapati sambhajinagar : अपघाताची घटना वैजापूर येथील स्टेशन रोड म्हसोबा चौकात घडली. दुभाजकावरील झाडांमुळे मुलीचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती नागरिकांनी दिली. मात्र मुलीच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.
काळ कोणाचा कधी घात करेल याचा काही नेम नाही. शिक्षण घेऊन उंच भरारी घेण्याची जिद्द बाळगणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला. अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलीचा अपघातात बळी गेल्याने जिल्ह्यात शोकाकुल वातावरण पसरले. शिकण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या हुशार विद्यार्थिनीची प्राणज्योत मालवली.
खाजगी क्लासेससाठी जात होती श्रेया
श्रेया हरिशचंद्र दुसाने वय १५ वर्षे रा. आनंदनगर ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेया ही सेंट मोनिका स्कूलची विद्यार्थिनी आहे. शाळेपूर्वी श्रेया इंग्रजी विषयाच्या खाजगी क्लासेससाठी सकाळी सहा वाजता सायकलने जात होती. श्रेया मसोबा चौकात रस्ता ओलांडत असताना भरधाव मालवाहू पिकप जिपने श्रेयाला जोराची धडक दिली. यात श्रेयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी तातडीने श्रेयाला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत श्रेयाचा मृत्यू झाला होता. या अपघातात पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला याची बातमी जिल्ह्यात पसरतात नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली.
दुभाजकावरील झाडांमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू?
या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एम एच ७५२ रोड वरील म्हसोबा चौकात हा अपघात झाला. या मार्गावर रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावलेले आहेत. यात सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली झाडे मोठी झाली. या झाडांची कटिंग न केल्यामुळे वाहनधारकांना अडसर ठरतात. छोटी वाहने दिसत नाहीत. यातूनच श्रेयाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नागरिकांनी दिली आहे.