Mumbai Kurla Best Bus Accident: बेस्ट उपक्रमाचे तत्कालीन महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची २४ डिसेंबरला बदली झाली. सध्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
हायलाइट्स:
- अपघात अहवाल गुलदस्त्यात
- बेस्टला कायमस्वरुपी महाव्यवस्थापकांची प्रतीक्षाच
- कांबळे यांनी पदभार स्वीकारलाच नाही
Pune Accident News : डॉ. दाते घरातून निघाल्या, वाटेत ट्रकची धडक, चाकाखाली चिरडून करुण अंत, लेकराचं मातृछत्र हरपलं
कुर्ल्यातील अपघातानंतर बेस्ट उपक्रमाने या अपघातामागील कारणे व त्यानंतर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल अपघातानंतर दोन दिवसांत सादर होणार होता. यानंतर सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली तयार करण्याचाही निर्णयही घेतला. त्याची जबाबदारी बेस्टच्या या समितीवर सोपवण्यात आली. यासंदर्भात बेस्ट महाव्यवस्थापकांकडून महत्त्वाचे निर्णय घोषित होणे अपेक्षित असतानाच डिग्गीकर यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आणि डॉ. हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती झाली. मात्र कांबळे यांनी पदभार स्वीकारलाच नाही.
त्यांची २ जानेवारीला मंत्रालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यामुळे बेस्ट महाव्यवस्थापकपद २४ डिसेंबरनंतर रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बेस्टच्या अपघाताच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने आपला अहवाल जोशी यांना सादर केला. सध्या जोशी यांच्याकडून बेस्ट उपक्रमाच्या कामाचा आढावा घेतला जात असून कुलाबा मुख्यालयातून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना कामासाठी मुंबई महापालिका मुख्यालयात धाव घ्यावी लागत आहे. गेल्या चार वर्षांत तीन महाव्यवस्थापक झाले. ४ जून २०२१ ते ४ जून २०२३ कालावधीत लोकेश चंद्र यांच्याकडे बेस्ट महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार होता. त्यानंतर विजय सिंगल हे दहा महिने, तर अनिल डिग्गीकर दहा महिने या पदावर होते. हर्षदीप कांबळे या पदावर रुजूच झाले नाहीत.