• Wed. Jan 8th, 2025
    संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या दारी, न्यायाची मागणी; ‘मारेकऱ्यांना सोडणार नाही’ फडणवीसांनी दिला शब्द

    Santosh Deshmukh Family Meets CM Fadnavis : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी न्याया मिळावा अशी मागणी घेऊन देशमुख कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी मुख्यमंत्री आणि देशमुख कुटुंबीय यांच्यात तासभर चर्चा झाली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी न्याया मिळावा अशी मागणी घेऊन देशमुख कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी मुख्यमंत्री आणि देशमुख कुटुंबीय यांच्यात तासभर चर्चा झाल्याचे समजते. यावेळी भाजप आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘आपण मारेकऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल, जेणेकरून गुन्हेगारांना एक संदेश मिळेल की कोणालाही माफ केले जात नाही, असा शब्द देशमुख कुटुंबीयांना दिला आहे.

    मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी देशमुख म्हणाले, ‘या प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही. यामागे कुणीही असेल त्याला शिक्षा मिळेल असे आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे. धनंजय देशमुख पुढे म्हणाले, आम्ही एफआयआर आणि पुरावे मुख्यमंत्र्यांना दाखवले आहेत, त्यावर सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सीडीआर काढा अशी मागणी केली आहे. आमची भूमिका केवळ न्यायाची आहे. या प्रकरणाचा नि:पक्षपातीपणे तपास झाला पाहिजे आणि यामागील मुख्य सुत्रधाराला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच तपासाचा अहवाल दोन दिवसांत मिळणार असल्याचेही देशमुखांनी सांगितले.

    सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीडमधील आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यासाठी देशमुखांनी विरोध केल्याने त्यांची हत्या करण्यात आली असे पोलीस तपासातून समोर येते. तर खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड देखील सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. सध्या याप्रकरणी न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी अशी त्रिकोणी चौकशी सुरु आहे. हे प्रकरणाचे धागेदोरे खोलवर असल्याचे तपासातून समजत आहे. तर मंत्री धनंजय मुंडेंवर देखील याप्रकरणी गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही भेट घेतली. परंतु अजित पवारांनी तुर्तास मुंडेंना अभय दिले आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed