• Wed. Jan 8th, 2025

    ‘एचएमपीव्ही’ आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 7, 2025
    ‘एचएमपीव्ही’ आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. ७: एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.

    पत्रकार परिषदेला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते.

    केंद्र शासनाच्या याबाबतीत येत असलेल्या दिशा निर्देश आणि मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या आजाराबाबत कोणीही अफवा पसरवू नये. नागरिकांनी वस्तुस्थिती लक्षात घेत अफवांवर विश्वास ठेवू नये. लहान मुले, वयोवृद्ध, दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. आजाराच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाचे संपूर्ण पथक कार्यरत असून लवकरच विशिष्ट कार्यपद्धती जाहीर करण्यात येईल. राज्यात आरोग्य विभागाची चांगली व्यवस्था असून यंत्रणा सज्ज आहेत. असे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

    या आजाराबाबत आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक म्हणाले, सध्या चीनमध्ये श्वसनविषयक आजाराच्या विषाणूबाबत समाजमाध्यमावर माहिती येत आहे. चीनमध्ये हिवाळी वातावरणामुळे श्वसन संसर्गाची वाढ अनैसर्गिक नाही. इन्फ्ल्यूंझा, आर. एस. व्ही, एचएमपीव्ही (Human Meta Pneumo Virus) यासारखे विषाणू कारणीभूत आहेत. हे विषाणू भारतासह जगामध्ये पहिल्यापासून प्रचलित आहे.

    एचएमपीव्ही हा साधारणतः सौम्य आजार आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असतात. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना आजाराचा जास्त धोका असू शकतो. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्भवतो.सद्यस्थितीत भारतामध्ये श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवाढीमध्ये वाढ आढळून आलेली नसून या स्थितीला काळजीचे कारण नाही. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधीसाठा आहे. या आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे करण्यात येत आहे.

    या आजारावर लक्षणाधारीत सहायक उपचार करण्यात येतो. या आजारावर प्रतिजैविके (antibiotics) अनावश्यक असुन कुठलीही लस किंवा उपयुक्त अशी अँन्टीव्हायरल (antiviral) औषधी नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    आजाराबाबत पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानेही खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय श्वसनाचे संसर्ग वाढू नये, यासाठी लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

    नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ही काळजी घ्यावी

    *जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवा

    *आपले हात वारंवार धुवा.

    *ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

    *भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे

    *संक्रमण कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा व कार्यालये इ. ठिकाणी हवा खेळती असावी.

    *हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळावा.

    *आजारी लोकांशी जवळचा संपर्क नसावा.

    *डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

    *सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

    *डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळावे.

    *सर्दी व खोकला झाल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed