• Tue. Jan 7th, 2025

    आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी योगदान द्या – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 5, 2025
    आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी योगदान द्या – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    मुंबई, दि. ०५:   गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात, आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो. यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

    ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर जयहिंद महाविद्यालय, मुंबई येथे आयोजित चर्चसत्रात मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार जयंत आजगावकर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि राज्यातील  प्राथमिक, माध्यमिक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    मंत्री श्री. भुसे म्हणाले की, राज्याच्या शिक्षण विभागाचे आपण सर्वचजण  एक घटक आहोत. आपण भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदानाचे जे पवित्र काम करत आहात ते अतुलनीय व भाग्याचे आहे. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती हा आव्हानात्मक विषय असला तरी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तो यशस्वीपणे राबविला जाईल याची खात्री आहे. विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षण विभागाचा एक रोडमॅप आपण ठरवू. येणाऱ्या काळात शैक्षणिक धोरण राबविताना सर्वांना सोबत घेऊन आपण काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.

    शिक्षकांना त्यांचे मुख्य उद्दिष्ट यशस्वीरित्या पार  पाडता यावे यासाठी त्यांना वेळ दिला जाईल. शिक्षण व शिक्षकासाठी जे-जे शक्य आहे ते केले जाईल. समाजामध्ये शिक्षकाला मानाचे स्थान आहे. हा त्याचा मान अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभागामार्फत पुढाकार घेतला जाईल. आजच्या चर्चासत्रात शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या अनुभवातून चांगले मुद्दे/सूचना मिळाल्या आहेत, असे मंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले.

    शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत आदर्श शिक्षकांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेण्यात येईल. अशा शिक्षकांची एक डाटा बँक तयार करून त्यांच्या ज्ञानाची, अनुभवाची शिदोरी राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यातील ग्रामीण, आदिवासी भागातील शाळांना शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण विभागाचे अधिकारी भेट देतील असेही ते म्हणाले.

    मंत्री श्री. भुसे म्हणाले, शिक्षक अविरतपणे मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम करत असतो. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती राबवताना त्याचे घटक असणाऱ्या, ज्ञानदानाचे काम करणाऱ्या या घटकाच्या, त्यांच्या संघटनांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. जे लहान-लहान प्रश्न आहेत ते त्वरित सोडवले जातील.  जे प्रश्न कायदे, नियम या संदर्भातील आहेत याबाबत सर्व संबंधितांची बैठक घेऊन त्यातूनही मार्ग काढला जाईल.  शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शिक्षण विभागामार्फत नियमित आढावा, चर्चासत्रे आयोजित केली जातील. संघटनांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात.

    या चर्चासत्रात शाळांमध्ये भौतिक सुविधा, संगणक प्रणालीचा वापर वाढविणे, मुख्याध्यापकांच्या नियमित कार्यशाळा,  वेतनेतर अनुदान वाढविणे, ॲकॅडमी शिक्षणावर शासनाचे नियंत्रण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग पदोन्नती मध्ये  शिक्षकांना संधी, राष्ट्रीय, राज्य, विभाग, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ, अशैक्षणिक कामापासून शिक्षकांची सुटका, जुनी पेन्शन योजना, प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षक,  सीबीएससी पॅटर्न लागू करणे, माध्यमिक शिक्षक संच मान्यता ऑनलाईन व्हावी, वेतन वेळेत व्हावे, अंशदायी अनुदान लवकर मिळावे अशा मागण्या विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या.

    आमदार जयंत आजगावकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *