• Thu. Jan 9th, 2025
    Dhirendra Shastri: भिवंडीत बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, विभूती घेण्यासाठी झाली तोबा गर्दी

    Edited byनुपूर उप्पल | Authored by विनित जांगळे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 5 Jan 2025, 12:05 am

    Bhiwandi Bageshwar Baba News: भिवंडीत बागेश्वर बाबाच्या सत्संग कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या क्रार्यक्रमात विभूती घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली. यादरम्यान, चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.

    हायलाइट्स:

    • भिवंडीत धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी
    • सुरक्षारक्षक, पोलिसांच्या प्रसंगवधानाने कोणालाही दुखापत नाही
    • विभूती घेण्यासाठी उडाला गोंधळ, बागेश्वर बाबाने अर्ध्यावर सोडला सत्संग
    महाराष्ट्र टाइम्स

    ठाणे: श्री बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्णजी शास्त्री महाराज यांचा भिवंडीत कार्यक्रम होता. भिवंडीतील दिवे अंजूर परिसरात भव्य असा सत्संग कार्यक्रम आणि दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (४ जानेवारी) झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यावेळी सत्संगस्थळी नेमलेले सुरक्षारक्षक व पोलिसांनी प्रसंगावधान राखत गर्दी हटवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

    कार्यक्रमादरम्यान सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही

    सुदैवाने या कार्यक्रमात कोणालाही दुखापत झाली नसून धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्याकडून विभूती घेण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी एकच गर्दी केल्याने हा प्रकार घडला. दरम्यान, या गोंधळानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी सत्संग कार्यक्रम अर्ध्यावर सोडला. या घटनेमुळे धार्मिक कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

    भिवंडीतील एका गोदाम संकुलात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा सत्संग सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी अनुयानांना विभूती घेण्यासाठी सर्वप्रथम महिलांना, त्यानंतर पुरुषांना रांगेत येण्याचे आवाहन केले होते. ही विभूती घेण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. यावेळी व्यासपीठावर जाण्यासाठी गर्दी केल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात व्यासपीठावर जिन्याची रेलिंगही तुटली. त्यामुळे काही महिला खाली पडल्या.

    परिस्थिती हाताबाहेर जाताच सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली

    पुरुषांची धक्काबुक्की झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाताच सुरक्षारक्षक व पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला. तसेच, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केल्याची माहिती आहे. या गोंधळानंतर धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी व्यासपीठ सोडले. पोलिसांनी गर्दीत खाली कोसळलेल्या अनुयानांना उचलून बसवले, त्यांना पाणी पाजले. घटनेत कोणाला दुखापत न झाल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी सांगितलं आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed