• Wed. Jan 8th, 2025

    पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 4, 2025
    पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू – महासंवाद




    बुलढाणा, दि.४ (जिमाका) : सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या सुदृढ आरोग्यासाठी आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने सर्वदायी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येईल, असे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीच्या सत्काराप्रसंगी पत्रकारांना आश्वस्त केले.

    मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाली असून गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालयात हा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी पत्रकारांसाठी व्यापक स्तरावर आरोग्य शिबीराची मागणी केली होती. या मागणीला तात्काळ होकार देत केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी आरोग्य शिबीरासाठी आयुष मंत्रालय पुढाकार घेईल आणि पत्रकारांसाठी सर्वदायी आरोग्य शिबीर आयोजित केले जाईल, असे आश्वस्त केले.

    बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठन करण्यात आले आहे. बुलढाणा दौर्‍यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री ना.जाधव यांनी अविरोध निवड झालेले जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसीम शेख, सहसचिव शिवाजी मामलकर, महिला सेल जिल्हाध्यक्ष कु.मृणाल सावळे, सोशल मिडीया प्रमुख संजय जाधव यांचा सत्कार केला. याशिवाय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत बर्दे यांची आणि अधिस्वीकृती परिषदेच्या सदस्यपदी राजेंद्र काळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. पत्रकार प्रा. युवराज वाघ यांनी या सत्कार सोहळ्याचे संचलन करीत नवीन कार्यकारिणीचा परिचय करुन दिला.

    यावेळी  केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ. गोपाल डिके, चंद्रकांत काटकर, पत्रकार विश्वास पाटील, गजानन काळुसे, सुरेखा सोमनाथ सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed