• Thu. Jan 2nd, 2025
    मुख्यमंत्री साहेब, माझ्या वडिलांना न्याय द्या! संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर

    Edited byनुपूर उप्पल | Authored by विनोद वाघमारे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 30 Dec 2024, 9:07 pm

    Santosh Deshmukh Murder Case: जे माझ्या वडिलांसोबत घडलं ते कोणासोबत घडू नये, आरोपींना कठोर शिक्षा द्या, माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी संरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: ‘जे माझ्या वडिलांसोबत घडले, ते इतरांसोबत घडू नये, यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या. म्हणजे यापुढे कोणताच गुन्हेगार असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. माझ्या वडिलांना न्याय द्या,’ अशी आर्त हाक मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने दिली. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

    संतोष देशमुख यांची हत्या व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे सोमवारी राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या राजवाड्यापासून तहसील कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, मुलगा विराज आणि बहिणीसह मस्साजोगमधील नातेवाइक व नागरिक सहभागी झाले होते. देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, या मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या. यावेळी बोलताना वैभवीला अश्रू अनावर झाले.

    रडू कोसळतच ती म्हणाली, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले, संस्कार दिले. ते आपण जपत आलो आहोत. जिजाऊंपासून स्फूर्ती घेण्यासाठीच आज मी इथे आले आहे. मुख्यमंत्र्यांकडे जिजाऊ जन्मस्थळावरून माझी विनंती आहे की माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना तत्काळ पकडून कठोरात कठोर शिक्षा करावी. माझ्या वडिलांची क्रूर हत्या करण्यात आली. या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. जे परिस्थितीमुळे लढू शकले नाही, त्यांना न्याय मिळायला हवा. जेव्हा जेव्हा न्यायासाठी मोर्चे निघतात त्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही वैभवीने केले.

    मोर्चात माजी आमदार राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर, ॲड. संदीप मेहेत्रे, ज्योती जाधव, बाबुराव मोरे, राजेंद्र आढाव, शिवाजी राजे जाधव यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता.

    ‘तुमची साथ कायम हवी’

    तुमच्या सर्वांची साथ केवळ न्याय मिळेपर्यंत नाही तर आमच्या पुढच्या वाटचालीसाठीही कायमस्वरूपी राहू द्या, अशी विनंती देखील वैभवीने केली. सिंदखेड राजात आगमन झाल्यानंतर वैभवी, विराज, त्यांची आत्या आणि अन्य नातलगांनी जिजाऊंचे दर्शन घेतले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed