• Thu. Jan 2nd, 2025
    ‘शालेय मुलींना अवघड जागी मारले,’ म्हणत आंदोलक महिलांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर पोलिसांनाच घेरले

    Parbhani News: आमच्या तेरा वर्षाच्या शालेय लहान मुलींना पोलिसांनी अवघड जागी काठ्या मारुन मोठ्या प्रमाणावर मारहाण केली आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारींचा पाढा परभणीतील महिलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर पोलिसांबाबतीतील तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला.

    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी : तुम्हाला सांगायची आम्हाला लाज वाटत आहे पण आमच्या तेरा वर्षाच्या शालेय लहान मुलींना पोलिसांनी अवघड जागी काठ्या मारुन मोठ्या प्रमाणावर मारहाण केली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनतेवर अत्याचार केला आहे. आंदोलनात सहभागी नसलेल्या आपल्या घरी असलेल्या महिला, लहान मुली तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर विनाकारण अमानुष मारहाण करण्यात आली. पण अद्यापही त्या पोलिसांवर कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तर दुसरीकडे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवरही कारवाई झाली नाही, असे म्हणत आक्रमक झालेल्या महिलांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर पोलिसांबाबतीतील तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला.

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर आले होते त्यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला देखील त्यांनी भेट दिली. दहा डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर आंबेडकरी जनतेकडून रास्ता रोको रेल रोको आंदोलन करण्यात आले. ११ डिसेंबरला परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत बंद यशस्वीरित्या पूर्ण होत असतानाच या बंदला गालबोट लागले. दगडफेक जाळपोळीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज झाला. अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्या लाठी चार्जमुळे अनेक आंबेडकरी तरुण तरुणी महिला वृद्ध यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यांदा आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते.
    पैशांचा वाद टोकाला गेला अन् माणुसकीला काळीमा फासवणारं भयंकर कृत्य घडलं, नागपुरात दोन सख्ख्या भावांना निर्दयीपणे संपवलं
    यावेळी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने आठवलेंसमोर पुन्हा एकदा आरोपांचा पाढाच वाचला. माझा मुलगा शिक्षण घेत होता तो संविधानाचा अभ्यास करत होता, माझ्या मुलाला पोलिसांनी अमानुष मारहाण केली. न्यायालीन कोठडी दरम्यान माझ्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मला कळविण्यात आले. दहा तारखेला माझ्या मुलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर माझ्या मुलाच्या मृत्यूनंतरच आम्हाला सांगण्यात आले. माझ्या मुलाचा खून ज्या पोलिसांनी केला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सोमनाथच्या आईने केली.

    रिपब्लिकन पक्षाकडून पीडित कुटुंबांना पाच लाखाची मदत

    परभणीत झालेल्या दंगलीनंतर न्यायालयीन कोठडी दरम्यान मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पाच लाख रुपयाची मदतीची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात ही मदत पक्षाकडून त्यांना देण्यात येईल असेही सांगण्यात आले. त्याचबरोबर त्या पोलिसांनी अमानुषपणे लाटे चार्ज केला त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासंदर्भात सरकारकडे पाठव पुरावा करणार असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed