Beed Santosh Deshmukh Murder Anjali Damania Claim : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा मृतदेह सापडल्याचा व्हाईस मेसेज मिळाला, असे त्या म्हणाल्या होत्या. हा दावा पोलिसांनी खोडून काढला आहे.
संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी अंजली दमानिया यांचा दावा आता फोल ठरला आहे. व्हॉइस मेसेजचा पुरावा देऊन दमानियांनी संतोष देशमुखांच्या हत्येतील फरार असलेल्या तीन आरोपींचा मृतदेह सापडला असल्याची माहिती देत पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु कर्नाटक सीमेवरील बसवकल्याण येथे असे कोणतेही मृतदेह सापडले नसल्याचा मोठा खुलासा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी म्हटले की, ज्या व्यक्तीने व्हॉईस मेसेज केला होता तो दारुच्या नशेमध्ये असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक काढून दमानियांचा दावा खोडून काढला आहे. प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले की, मस्साजोग, बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर जो व्हाईस मेसेज आला की बश्वेश्वर कल्याणला तीन मृतदेह सापडले आहेत ती माहिती खात्रीलयक नाही. या व्हॉईस मेसेजची बीड पोलिसांनी खात्री केली असता असा काहीएक प्रकार घडलेला नाही. ज्या इसमाने अंजली दमानिया यांना व्हाईस मेसेज पाठविला त्याने दारुच्या नशेत असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी नागरिकांनाही आवाहन केले आहे की, कृपया अशी कोणतीही माहिती असल्यास आपण प्रथम पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपीच्या शोधकार्यात अडथळा अथवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची माहिती पसरवू नये किंवा वक्तव्य करू नये. काही उपयुक्त माहिती असल्यास बीड पोलीसांना कळवून तपास कार्यात सहकार्य करावे. या घटनेविषयी कोणाकडे माहिती असल्यास त्याने पोलीस अधिकाऱ्यास किंवा पोलिसांना द्यावी.