Dhananjay Munde: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे, कराड यांच्याबद्दलची स्फोटक माहिती, फोटो, व्हिडीओ समोर आणले आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दमानिया यांना कोण दारुगोळा पुरवतंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
‘बीडची स्थिती आज अशी झालेली नाही. ११-१२ वर्षांपासून मी तिकडे काम करतेय. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना २०११-१२ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा आम्ही बीडमधील खेडेगावांमध्ये पाण्याच्या टाक्या दिल्या होत्या. त्यावेळी दुष्काळात चारा घोटाळा सुरु होता. तो आम्ही जवळून पाहिला. त्या काळात राजेश टोपे, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात मी लढले.. तेव्हा माजी सहकारी प्रीती मेनन माझ्या सोबत होती. त्यावेळी तिथले अनेक लोक आम्हाला सांगायचे, रात्री प्रवास करु नका. हा मिनी बिहार आहे. इथे रात्री गाड्या थांबवून लूटमार केली जाते. २०१४ नंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. कारण धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंचं प्रस्थ वाढलं. कराडसारखे लोक मोठे करण्यात आले. त्यांची दहशत वाढत गेली,’ अशा शब्दांत दमानियांनी बीडमधील स्थितीवर सविस्तर भाष्य केलं. ‘मुंबई तक’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा, हजारो नागरिक रस्त्यावर; CM फडणवीसांनी काढले २ महत्त्वाचे आदेश
बीडमधील सद्यस्थिती, दहशत जाणून घेण्यासाठी काय काय केलं, माहिती कशी मिळवली, तेदेखील दमानियांनी सांगितलं. ‘आधी कलेक्टरना ईमेल केला. बंदुका किती आहेत त्याची विचारणा केली. कारण दहशत पसरवायला बंदूक वापरली जाते. संतोष देशमुखांना मारहाण झाली. ही सगळी माणसं क्रूर आहेत. त्यांना कोणाची दया येत नाही. दहशत निर्माण करण्यासाठी बंदुकांचा वापर मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. तेव्हा बंदुका, परवान्यांची पीडीएफ फाईल मागवली. तेव्हा कळलं १२२२ शस्त्र परवाने एकट्या बीडमध्ये आहेत. इतके परवाने कशाला..? आजूबाजूच्या जिल्ह्यात किती परवाने आहेत ते तपासलं. तर अमरावतीत २४३, परभरणीत फक्त ३२ परवाने आहेत. बीडमध्ये अधिकृत परवाने १२२२ आहेत. मग अनधिकृत किती असतील?,’ असा प्रश्न दमानियांनी विचारला.
‘त्यानंतर मी ट्विटरवर एक मेसेज केला. त्यात एक नंबर दिला. ज्यांच्याकडे बीडमधील गुंडगिरी, दहशत दाखवणारे फोटो, व्हिडीओ असतील, ते त्यांनी पाठवावेत, असं आवाहन केलं. त्यानंतर धडाधड फोन यायला लागले. व्हिडीओ, फोटो यायला लागले. त्याआधी काहींनी माझा फोन नंबर वेबसाईटवरुन शोधला होता. त्यांनी मला व्हॉट्स ऍपवर मेसेज करायला सुरुवात केली. प्रत्येक मेसेजमध्ये खाली लिहिलेलं असायचं, कृपया आमचं नाव बाहेर येऊ देऊ नका. यातून बीडमध्ये दहशत किती आहे ते दिसलं. प्रत्येकानं अशीच विनंती केली. कारण माहिती देणारे तिथेच राहतात. त्यावरुन लोकांच्या मनातील भीती समजली,’ असं दमानियांनी सांगितलं.
उल्लेख केवळ आमचा का? धसांबद्दल स्पष्टच बोलली प्राजक्ता; ‘तिथे’ कोण कोण होतं? सगळं सांगितलं
‘बीडमधील दहशत संपवण्यासाठी मी धडाधड ट्विट करायला लागले. एकीकडे मी ते आधी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत सरांना पाठवायचे. मग ती माहिती ट्विट करायचे. कावत सरांनी प्रत्येक मेसेजची दखल घेऊन गुन्हे नोंदवायला सुरुवात केली आहे, शस्त्रं परवाने परत घेण्यास सुरुवात केली आहे याबद्दल समाधान वाटतं. मी त्यांना सांगितलं, तुम्ही काडतुसांची चौकशी करा. किती काडतुसं वापरली गेली आहेत? म्हणजे एखाद्याकडे शस्त्र परवाना असेल, तर त्यानं किती काडतुसं वापरलीत आणि वापरली गेली नाहीत तेदेखीस तपासा. या परिस्थितीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं,’ असं दमानिया म्हणाल्या.