Jitendra Awhad: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमधील गुंडगिरी, दहशत, धाकदपटशा याविरोधात जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे.
आव्हाड यांनी त्यांच्या भाषणातून काही गौप्यस्फोट केले. यावेळी त्यांनी पोक्षे नावाच्या एका अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा संदर्भ दिला. ‘तो अधिकारी सांगत होता, तो इतके कर्तव्यावर असताना बीडमध्ये दररोज मारामारीच्या घटना घडायच्या. पण एका कलेक्टरची बदली झाली. तो कलेक्टर पुन्हा दिसला नाही. खरं काय ते माहीत नाही. पण या अधिकाऱ्याकडून माहिती घ्या. त्यांच्या तोंडातून खरं काय ते बाहेर येईल,’ असं आव्हाड म्हणाले. ‘एक कलेक्टर इकडून गायब झाले. ते पुन्हा कधीच परतले नाहीत. शासन दरबारी त्यांची कोणतीही नोंद नाही,’ असा सनसनाटी दावा त्यांनी केला.
पंकूताई तुम्हाला सवाल आहे, धस यांचा स्वपक्षीय नेत्याला प्रश्न; किती खून झाले? यादीच वाचली
‘संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. हा प्रश्न राजकारणाचा, जातीपातीचा नाही. इकडे प्रश्न माणुसकीचा आहे. आज ही एकी माणुसकीसाठी दाखवली आहे. आज एक ठिणगी पडली आहे. आरोपीला अटक झाली नाही, तर संपूर्ण राज्यात उद्रेक होईल. काही जण या सगळ्यात जात आणतात. मी जातीनं वंजारी आहे. पण आमच्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय. या परिस्थितीत मी शांत बसलो तर मग मी वंजारी नाही. न्यायासाठी लढताना जातीचा विचार कधी करायचा नसतो,’ असं आव्हाड म्हणाले.
बीडमधील भाषणात आव्हाडांनी राज्य सरकारलादेखील धारेवर धरलं. ‘धनंजय मुंडे मंत्री आहेत. उद्या मुंबईत बसून धनुभाऊंनी फोन केल्यावर इथला अधिकारी जाणार की नाही? मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार. त्यानं डोळ्यांनी इशारा केला तरी चौकशी संपली. असं होणार असेल तर मग चौकशी करुच नका. संतोषच्या पत्नीला, त्याच्या मुलीला उगीच आशा दाखवू नका. चौकशी करण्याचं नाटक करुन चौकशीच करायची नाही, असं करु नका. त्यांचा उगाच अपेक्षाभंग करु नका. कारण अपेक्षाभंगाचं दु:ख मोठं असतं,’ अशा शब्दांत आव्हाड सरकारवर बरसले.