• Sun. Dec 29th, 2024
    सेक्रेटरीने दुचाकी “बाजुला लाव” म्हटले, तेच कुटुंबाच्या जीवावर बेतले,घरात घसून….

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 28 Dec 2024, 1:32 pm

    Satara News : किरकोळ कारणावरून एका कुटुंबावरच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरासह परिसर हादरला आहे. या घटनेत हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षासह दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले असून त्याच्या घरात गावठी पिस्तूलसह १६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    संतोष शिराळे, सातारा : सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये रात्री नऊच्या सुमारास किरकोळ कारणावरून एका कुटुंबावरच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरासह परिसर हादरला आहे. या घटनेत हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षासह दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले असून त्याच्या घरात गावठी पिस्तूलसह १६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सुरेश काळे (वय ३८, मूळ रा. तळबीड. सध्या सैदापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. जखमींना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी, की होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीमध्ये अक्षरा गृहनिर्माण सोसायटी आहे. तेथे त्या सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप बारा वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर पाच वर्षापासून संशयित सुरेश काळे राहतो. रात्री साडेआठच्या सुमारास काळे सोसायटीत आला. त्याने त्याची दुचाकी रस्त्याच्या आडवी लावली होती. तेथून अध्यक्ष घोलप त्याच वेळी जात असताना त्यांनी काळेला “दुचाकी बाजूला लावा”, असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याचा राग मनात धरुन तो तिथून गेला.

    अर्ध्या तासात तो पुन्हा घोलप यांच्या घरी गेला. त्यावेळी घोलप जेवत होते. बेल वाजल्याने घोलप यांनी दरवाजा उघडला, तर समोर काळे होता. मला तुमच्याशी बोलायचं आहे, असे त्याने घोलप यांना सांगितले. घोलप यांनी जेवण करून आलो. आत बसा, असे म्हटले. मात्र, त्यांनी बसण्यास नकार दिला. ते जेवत असतानाच घरात घुसलेल्या काळेने थेट गोळीबार सुरू केला. त्याच्या गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारामध्ये घोलप यांच्या चेहऱ्याला गोळी लागली. त्यांच्या मुलीच्या दोन्ही हातांना गोळ्या लागल्या आहेत. गोळीबारामुळे तेथे मोठा गोंधळ उडाला. घोलप कुटुंबीयांच्या आरडाओरडीमुळे लोक जमा झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

    पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी, फौजदार निखिल मगदूम, हवालदार सागर बर्गे यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती घेतली.

    यावेळी सुरेश काळेने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. त्याच्यासोबत त्याच कुटुंब होतं. त्याच्याकडे गावठी कट्टा पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरीने दरवाजा उघडण्याची विनंती केली. दरवाजा उघडल्यानंतर काळेने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शांत करत अचानक त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या घरात शोध घेतला, त्यावेळी धान्याच्या मोठ्या बॅरेलखाली लपवून ठेवलेली पिस्तूल सापडली. त्यासोबत १६ जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचले होते. त्यामुळे संशयिताला पळून जातात आले नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed