• Wed. Dec 25th, 2024

    सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 24, 2024
    सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    प्रतिकुल परिस्थितीत लोकसेवेचा दीप ताईंनी तेवत ठेवला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    नागपूर दि 24:- अत्यंत आव्हानात्मक अशा काळात सुमतीताईंनी खूप संघर्ष केला. अनेक लोकआंदोलने केली. त्यांच्या सोबत अनेक घटकातील कार्यकर्त्यांनी संघर्षाची बीजे घेऊन समाजात विश्वासार्हता निर्माण केली. ताईंच्या संघर्षाच्या समृद्ध वारशावरच आम्हाला यश प्राप्त करणे शक्य झाले. त्याकाळात ताईंसह अनेक निस्वार्थ कार्यकर्त्यांनी रचलेल्या पायावर आम्हाला कळसापर्यंत पोहोचता आले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सुमतीताई या केवळ लढवय्या ताई नव्हत्या तर त्यांना लोकमाता म्हणून संबोधने अधिक समर्पक असल्याचे त्यांनी सांगितले.

    श्रद्धेय सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहात ते बोलत होते. येथील स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. मिराताई खडतकर, कार्यक्रमाचे संयोजक अनिल सोले, माजी प्र-कुलगूरु योगानंद काळे, उपेंद्र कोठेकर, माजी आमदार अरुणभाऊ अडसड, चैनसुख संचेती व मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार चरणसिंग ठाकूर माजी मंत्री शोभाताई फडणवीस व मान्यवर होते.

    भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्या सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाला लोकांची सहानुभूती असूनही मोठ्या प्रमाणात गैरसमजही होते. अशा काळात समाजाच्या प्रत्येक घटकात जाऊन त्यांच्यासाठी विविध आंदोलने करण्याची जबाबदारी सुमतीताईंनी समर्थपणे पेलली. सर्वांची मने त्यांनी पुन्हा जुळवली. आपली भूमिका लोकांपर्यंत जावी, आपल्या विचाराचा दीप घरोघरी पोहोचावा यासाठी त्यांनी निवडणुकीत अनेक पराभव सहन करुनही तेथून पळ काढला नाही. शुद्ध भावनेतून त्यांनी ए.बी. बर्धन पासून सर्वांची मने एक ताई म्हणून, आई म्हणून जिंकली. राजकारणातला एक आदर्श वस्तुपाठ सुमतीताईंनी आमच्या पुढे ठेवला आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला.

    माझ्यासाठी त्या आत्याच होत्या. माझे वडील गंगाधरराव व काका बाळासाहेब यांचे हक्काचे घर म्हणजे सुमतीताईंचे घर होते. शोभाताईंनी त्यांच्या बरोबरीने संघर्ष केला. त्यांनी स्थापन केलेल्या बाल जगतच्या माध्यमातून मला घडता आले. नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून मला लहानपणी पहिल्यांदा दिल्लीला जाता आले. लहान मुलांवर संस्काराच्या जबाबदारीपर्यंत त्यांनी आपली भूमिका समर्थपणे पेलली, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस जुन्या आठवणींना आठवतांना भावूक झाले.

    ताईंनी जपलेली विश्वासार्हता व समाजात उभी केलेली संघटन शक्ती याचा प्रत्यय 1962 च्या काळात तेव्हाच्या प्रशासनाने घेतला. युद्धासाठी सुमारे 700 ते 800 सैन्यांची तुकडी नागपूर येथून जात असल्याचा निरोप तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ताईंना दिला. त्यांच्या जेवणाची व्यवस्था अवघ्या चार तासात करण्याचे आव्हान समोर होते.  ताईंना त्यांनी ही जबाबदारी सोपविली. देशप्रेमासाठी सदैव तत्पर असलेल्या ताईंनी ही जबाबदारी समर्थपणे पेलून आपल्या सर्व महिला शक्तीच्या माध्यमातून सगळ्या सैनिकांपर्यंत त्यांनी जेवन पोहोचविल्याच्या घटनेला उजाळा देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सूक्ष्म नियोजन शैलीचा गौरव केला.

    प्रतिकुल परिस्थितीत लोकसेवेचा दीप ताईंनी तेवत ठेवला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी

    ताईंचा काळ हा संघर्षाचा होता. निवडणुकीत पराभूत व्हायचे, त्याबद्दल दु:ख व्यक्त करुन पुन्हा कामाला लागायचे, लोकन्यायाची लढे लढायचे, पुन्हा निवडणूक, पुन्हा पराभव असे सातत्याने वाट्याला येऊनही सुमतीताईंनी जपलेला संघर्षाचा बाणा हा विसरता येणार नाही. त्या लढत राहिल्या. त्यांनी रणांगण सोडले नाही. एखादा नंदादीप तेवत ठेवावा तसे त्यांनी योगदान देऊन आमच्या यशाचा सूकर केला, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

    यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ताईंच्या जीवनकार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्या एक झुंझार रणरागीनी होत्या. राजकारणात कुठे थांबावे याचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. त्यांच्या जीवनकार्याचा अंश आम्हाला मिळाला असे त्यांनी सांगितले.

    ताईंच्या या जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ मंडळी, कार्यकर्त्यांचा त्यांनी सन्मान केला. यावेळी सुमतीताई यांच्या जीवनकार्याला अधोरेखित करणाऱ्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed