Ajit Pawar Reaction On Beed Case: बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवू, असं अजित पवार म्हणाले.
संतोष देशमुख यांची हत्या ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे – अजित पवार
बारामतीत बोलताना अजित पवार म्हणाले की, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या सरपंचांची झालेली हत्या ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मी बीड, परभणीत जात त्या कुटुंबांच्या भेटी घेतल्या. त्यांना आधार दिला. राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझे ते कर्तव्य होते. घडलेल्या घटनेबाबत मी बीडच्या सिव्हिल सर्जनशी बोललो. त्यांनी सांगितले की, दादा, मी आजवरच्या कारकिर्दीत अशी घटना बघितली नाही. एखाद्या प्राण्यावर सुद्धा आपण इतक्या क्रूरतेने अत्याचार करत नाहीत.
ही बाब सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारी नाही – अजित पवार
सुसंस्कृत महाराष्ट्राला ही बाब शोभणारी नाही. आम्हाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. त्यामुळे राज्यभर एक मेसेज गेला पाहिजे की यापुढे कोणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही. दोषींना फाशीची शिक्षा होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवू. पण, कोणीही आणि कितीही मोठा मास्टरमाईंड असो, त्याला सोडणार नाही.
छगन भुजबळ यांचे नाव न घेता टोला
राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारात काही नव्या लोकांना संधी देताना जुन्या-जाणत्यांना थांबावे लागले. त्यातून काही ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे. त्यांना केंद्रात काम करण्याची संधी देत त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल. त्यात तसूभरही कमी पडणार नाही, परंतु त्यांनीही चुकीच्या पद्धतीने वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य करत टोला लगावला.