• Sat. Mar 14th, 2026

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 13, 2026
    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १३: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित यंत्रणांनी  कायमस्वरूपी तोडगा काढावा. पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून पुनर्वसनासंदर्भात नियोजन करावे. निश्चित कालावधीत उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीवरील नागरिकांचे प्राधान्याने पुनर्वसन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत दिले.

    उद्यानातील अतिक्रमणधारकांना पुनर्वसन होईपर्यंत मानवीय दृष्टिकोनातून मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुलुंड आणि ठाणे बाजूकडील अतिक्रमणधारकांनाही पुनर्वसनासाठी त्या बाजूकडील जागांचा शोध घेऊन नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

    बैठकीला वन मंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार , सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार सर्वश्री राजहंस सिंह, प्रवीण दरेकर,  प्रकाश सुर्वे, राजेंद्र गावित, मिहिर कोटेचा उपस्थित होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहनिर्माण विभागाने जागांच्या प्राप्त पर्यायापैकी सोप्या व गतीने पूर्ण होऊ शकणाऱ्या पर्यायाचा उपयोग करून पुढील एक महिन्याच्या आत पुनर्वसनासंदर्भात नियोजन सादर करावे. हद्द निश्चितीनंतर तातडीने हद्दीवरील आणि कोअर क्षेत्रातील अशा ५ हजार नागरिकांचे जवळ उपलब्ध असलेल्या जागेचा उपयोग करीत नियमानुसार प्राधान्याने पुनर्वसन करावे. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून अतिक्रमण निष्कासन आणि पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा. अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील ठाणे, मीरा-भाईंदर, मुंबई महापालिका, गृहनिर्माण व वन विभाग यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भविष्यात संजय गांधी उद्यानाच्या आजूबाजूला नवीन अतिक्रमण होणार नाही, याची काळजी संबंधित विभागांनी घ्यावी. पुनर्वसन करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात यावी. तसेच  अतिक्रमणधारकांची संख्या निश्चित करावी. या उद्यानातील अतिक्रमणधारकांचे जवळच्याच जागेवर पुनर्वसन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

    बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव (वन) मिलिंद म्हैसकर, पोलीस आयुक्त देवेन भारती, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल, संजय  गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक श्रीमती पाटील आदी उपस्थित होते. तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांनी बैठकीत सहभाग घेतला.

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची माहिती

    महानगराच्या हृदय स्थानी वसलेले जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान, मुंबईतील पूर नियंत्रणात महत्त्वाचे योगदान,  तुळशी विहार व पवई तलावांचे पाणलोट क्षेत्र, दहिसर, पोईसर, मिठी व ओशिवरा नद्यांचे उगमस्थान, देश विदेशातील लाखो पर्यटकांचे आकर्षण स्थळ, निसर्ग भ्रमंती व वन्यजीव निरीक्षणासाठी प्रसिद्ध ठिकाण. निसर्ग व संस्कृतीचा अद्भुत संगम असलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्या, उद्यानात ४३ पाडे व नगर असून २००० पेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांची संख्या आहे.

    0000

    निलेश तायडे/वि.सं.अ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed