• Sat. Dec 28th, 2024
    इजा बिजा तिजा… सलग तिसऱ्यांदा ‘अपमान’, भुजबळांचा संताप; आक्रमक नेत्यासमोर कोणते पर्याय?

    Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या नाशिकमध्ये आहेत. नागपूरमध्ये सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकला परतले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नाशिक: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या नाशिकमध्ये आहेत. नागपूरमध्ये सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकला परतले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवू, असं भुजबळ यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भुजबळ पुढे काय करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

    निर्णय घेताना विश्वासात घेतलं जात नाही. शरद पवारांसोबत काम करताना अशी पद्धत नव्हती. त्यावेळी मी निर्णय प्रक्रियेत असायचो. शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करताना मला कायम विश्वासात घेतलं जायचं, असं म्हणत भुजबळांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर थेट भाष्य केलं. नाराज भुजबळ काय करु शकतात, त्यांची नाराजी महायुतीला किती महागात पडू शकते, भुजबळ यांच्यापुढे सध्या काय पर्याय आहेत, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.
    फडणवीस-ठाकरेंमध्ये कशावर चर्चा? भेटीचे साक्षीदार सचिन अहिरांकडून इत्यंभूत माहिती
    राज्यात मराठा आंदोलन तापलेलं असताना, मनोज जरांगे महायुती सरकारला लक्ष्य करत असताना त्यांचा थेट समाचार घेण्याची कामगिरी भुजबळांनी केली. त्यांनी ओबीसींचे मेळावे घेत जरांगेंना थेट अंगावर घेतलं. मराठा मतदार महायुतीपासून दुरावलेले असताना भुजबळांनी ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करण्यात मोलाची भूमिका पार पाडली. त्याचा फायदा महायुतीला झाला. विशेष म्हणजे ओबीसी समाज कायम भाजपसाठी आधार राहिलेला आहे. भाजपचा डीएनए ओबीसी आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं.

    भुजबळ ओबीसींचे मोठे नेते आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून ते ओबीसींचं राजकारण करतात. लढाऊ नेते अशी त्यांची ओळख आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्याकडे फार पर्याय नाहीत. कधीकाळी शिवसेना सोडून शिवसैनिकांचा रोष ओढवून घेणारे भुजबळ आता राष्ट्रवादी सोडून सत्तेतून बाहेर पडतील का, हा प्रश्नाचं उत्तर नाही असं मिळतं. विरोधकांची सध्याची स्थिती पाहता भुजबळ ते विरोधी पक्षात जाण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
    Udayanraje Bhosale: पक्षादेश झुगारला, भाजप उदयनराजे भोसलेंना नोटीस पाठवणार, तयारी सुरु; नेमकं प्रकरण काय?
    विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पत्रकार राजदीप सरदेसाई यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा उल्लेख आहे. ‘ईडीपासून सुटका झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ईडीपासून सुटका हा तर माझ्यासाठी एक प्रकारे पुनर्जन्मच होता,’ असं भुजबळ बंडाबद्दल म्हणाले होते, असा उल्लेख पुस्तकात आहे. त्यामुळे भाजपसोबत सत्तेत राहणं भुजबळ यांच्यासाठी किती गरजेचं आहे, ते समजून घेता येईल.
    ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, भाजपकडून जबाबदारी कोणाला? ‘शांत’ बसलेल्या नेत्याकडे धुरा?
    भुजबळ सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पण त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही. मग त्यांना राज्यसभेवर जायचं होतं. पण त्यांच्याजागी अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं. यानंतर आता भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज आहेत. पण त्यांचं वय आणि अन्य कारणं पाहता ते सत्ताधारी पक्ष सोडतील याची शक्यता कमीच आहे. ते अखेर राज्यसभेचा पर्याय स्वीकारु शकतात. अजित पवार आणि भाजपला त्यांचं उपद्रव्यमूल माहीत असल्यानं त्यांच्याकडून भुजबळांची समजूत काढली जाऊ शकते.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed