• Thu. Dec 26th, 2024

    ठाकरेंना अंगावर घेत भाजपला साथ; तरीही रवी राणांना मंत्रिपद नाही, नवनीत राणांचं स्टेटस चर्चेत

    ठाकरेंना अंगावर घेत भाजपला साथ; तरीही रवी राणांना मंत्रिपद नाही, नवनीत राणांचं स्टेटस चर्चेत

    Navneet Rana: महायुती सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज संपन्न झाला. नागपुरातील राजभवनात ३९ आमदारांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. भाजपकडून १९, शिवसेनेकडून ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ११ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमरावती: महायुती सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज संपन्न झाला. नागपुरातील राजभवनात ३९ आमदारांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. भाजपकडून १९, शिवसेनेकडून ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ११ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी महायुतीनं कॅबिनेट विस्तार मार्गी लावला आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात २५ नवे चेहरे आहेत.

    विशेष म्हणजे महायुतीच्या मंत्रिमंडळात छोट्या पक्षांना अजिबात स्थान देण्यात आलेलं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जनसुराज्य पक्ष, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाला मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण यातील एकाही पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण त्यांना शेवटपर्यंत भाजपकडून मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आलाच नाही.
    शिंदेंना नडणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळातून डच्चू; मोठ्या जबाबदारीची चर्चा, भाजपचा प्लान काय?
    रवी राणा यांच्या पत्नी आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्या एक शेर म्हणताना दिसत आहेत. ‘जिंदगी है.. समुंदर को क्या गम है, वो बता भी नही सकता और पानी बनकर आँखो में आ भी नही सकता.. जिंदगी है और लडाई जारी है..’ अशी शायरी राणा म्हणताना दिसत आहेत. शायरीतले शब्द लक्षात घेता नाराजीचा सूर स्पष्ट आहे.

    रवी राणा अमरावतीच्या बडनेऱ्यातून २००९ पासून सातत्यानं निवडून येत आहेत. सलग ४ निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. २००९, २०१४, २०१९ मध्ये ते अपक्ष लढले आणि विजयी लढले. तर २०२४ मध्ये त्यांनी युवा स्वाभिमानकडून लढत बाजी मारली. यंदा त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण ती अपूर्णच राहिली.
    भाजप, सेनेतून जोरदार विरोध; तरीही ‘तो’ नेता पुन्हा मंत्रिपदी; चर्चा १७०० कोटींच्या कामांची
    २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यावेळी भाजप एकटाच विरोधी बाकांवर होता. तर सत्तेत तीन पक्ष होते. त्यावेळी खासदार असलेल्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं. सत्तेला आव्हान देण्याची कामगिरी राणा दाम्पत्यानं करुन दाखवली. त्याच्या बदल्यात मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण झालेली नाही.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed