• Thu. Dec 26th, 2024

    Winter Session: परभणी हिंसाचार, बीड सरपंच हत्या, बेस्ट अपघात; अधिवेशनात विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचे संकेत

    Winter Session: परभणी हिंसाचार, बीड सरपंच हत्या, बेस्ट अपघात; अधिवेशनात विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचे संकेत

    Nagpur winter session: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होताच लगेच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी सूचना होणार नाहीत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २०२४-२५ या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर होतील. या मागण्यांवर दोन दिवस चर्चा होईल. याशिवाय राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन्ही सभागृहांत दोन दिवस चर्चा होणार आहे; तसेच नियम २९३ अन्वये प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्ताव यावर विधानसभेत चर्चा होऊन त्यास सरकारकडून उत्तर दिले जाणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    संजय व्हनमाने, मुंबई : परभणीत उसळलेला हिंसाचार, आंबेडकरी अनुयायांवरील पोलिसांची कारवाई, बीडमधील सरपंचाची हत्या, कुर्ला येथे ‘बेस्ट’ बसच्या अपघातातील सात जणांचा मृत्यू आणि शासकीय रुग्णालयात झालेला बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा आदी मुद्द्यांवरून उद्या, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधारी महायुतीची कोंडी करण्याचे संकेत आहेत.

    मुख्यमंत्री होणार लक्ष्य?

    विशेषतः परभणीतील हिंसाचारावरून महाविकास आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकण्याचे संकेत आहेत.

    राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर सत्ताधारी महायुती प्रथमच अधिवेशनाला सामोरी जात आहे. सलग सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात सरकारसमोर फारसे कामकाज नाही. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटनांमुळे विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.

    परभणीत राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून परभणी आणि आजूबाजूच्या परिसरात पडसाद उमटले. या घटनेचा निषेध म्हणून शहरात बंद पाळण्यात आला होता. घटनेचा निषेध करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने गृहखात्यावर टीका होत आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची पुण्यात हत्या झाली. त्यामुळे देशमुख आणि वाघ हत्या प्रकरणावर उपस्थित करून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

    काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात चालकाच्या बेदरकारपणामुळे ‘बेस्ट’ बसच्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता ‘बेस्ट’च्या कंत्राटी बसगाड्या आणि चालकांच्या अपुऱ्या प्रशिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. अधिवेशनात शिवसेना (उबाठा) आमदारांकडून मुंबईतील ‘बेस्ट’ खासगीकरणाचा प्रश्न लावून धरला जाऊ शकतो. राज्यात बनावट औषधे आणि गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात अॅझिथ्रोमायसिनच्या बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर, नागपूर, ठाण्यात बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे उघडकीस आल्याने विरोधक सरकारचे वाभाडे काढण्याचे संकेत आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *